Video: भाजपा-सेना 'दिलजमाई' ही रश्मी वहिनींची होती 'किमया', पुन्हा करणार का खिचडी अन् वडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 14:30 IST2019-11-05T14:25:26+5:302019-11-05T14:30:32+5:30
देशात इतर पक्षं असंगाशी संग करत असल्यानं, त्यांचा सामना करण्यासाठी झालं गेलं विसरून आम्ही एकत्र आल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं होतं.

Video: भाजपा-सेना 'दिलजमाई' ही रश्मी वहिनींची होती 'किमया', पुन्हा करणार का खिचडी अन् वडा?
मुंबईः विधानसभा निवडणूक निकालांनंतर भाजपा आणि शिवसेनेचे नेते एकमेकांची तोंडंही पाहत नसले तरी लोकसभा निवडणुकीआधी युती झाली तेव्हा ते 'लय भारी' खूशीत होते. या आनंदाच्या भरातच, 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रितेश देशमुखने घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-शिवसेना दिलजमाईची मजेशीर गोष्ट सांगितली होती. आज राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसताना, रश्मी वहिनींच्या किमयागार वडा आणि खिचडीची आठवण जागी झाली आहे.
आमचे आमदार फोडूनच दाखवा; राष्ट्रवादीचं भाजपाला थेट आव्हान
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं...; संजय राऊतांकडून 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न
लोकसभा निवडणुकीआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर युतीच्या चर्चेसाठी गेले होते. चार वर्षं सत्तेत एकत्र राहूनही शिवसेना सातत्याने भाजपा नेतृत्वावर टोचणारे शाब्दिक बाण सोडत होती. त्यामुळे या भावांमध्ये दिलजमाई कशी होणार, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून आम्ही पुन्हा एकत्र येत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. लोकसभाच नव्हे, तर विधानसभा निवडणूकही एकत्र लढवायची आणि 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्याची घोषणाही त्यांनी केली होती. त्यानंतर, दोनच दिवसांनी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर' सोहळा रंगला होता. त्यात रितेश देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या होत्या.
...तेव्हा संजय राऊतांच्या बाऊन्सरवर मुख्यमंत्र्यांनी ठोकला होता सिक्सर
...तर २०१४ मध्ये तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात; मुख्यमंत्र्यांनी काढला होता राऊतांना चिमटा
देशात इतर पक्षं असंगाशी संग करत असल्यानं, त्यांचा सामना करण्यासाठी झालं गेलं विसरून आम्ही एकत्र आल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं होतं. तेव्हा या 'दिलजमाई' सिनेमाचा डायरेक्टर कोण, स्क्रिप्ट रायटर कोण?, असा प्रश्न रितेशनं केला. तेव्हा, 'मातोश्री'वर गेल्यावर रश्मी वहिनींनी आम्हाला जे वडे खाऊ घातले, साबुदाण्याची खिचडी खाऊ घातली आणि वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले, त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही, विषयच संपला, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यावेळी समोर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेही बसल्या होत्या. त्यांनीही मनमुराद हसत मुख्यमंत्र्यांच्या उत्स्फूर्तपणा, हजरजबाबीपणाला दाद दिली होती. त्यावर, ही दिलजमाई तुम्ही आधीच का नाही केलीत, वडे आधीच का नाही खाऊ घातले, असं रितेशनं गमतीनं विचारलं होतं. सध्याच्या राजकीय परिस्थितीत, ही मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. रश्मी वहिनी, वडे आणि खिचडी खाऊ घालून 'दिलजमाई' घडवणार का?, असं काही नेटिझन्स विचारत आहेत. अर्थात, त्यासाठी अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांना 'मातोश्री'वर जावं लागेल आणि उद्धव यांना त्यांचं स्वागत करावं लागेल. नेमकं इथंच तर घोडं अडलंय!