मी त्यांना 'जोकर' म्हणत नाही, पण; राऊतांच्या ED विधानावर फडणवीसांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 15:43 IST2022-06-13T15:39:10+5:302022-06-13T15:43:52+5:30
ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं.

मी त्यांना 'जोकर' म्हणत नाही, पण; राऊतांच्या ED विधानावर फडणवीसांचा पलटवार
मुंबई - राज्यसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. यंत्रणा आमच्याकडेही आहेत, फक्त ईडी नाही. जर ईडी ४८ तास आमच्याकडे दिली, तर भाजपासुद्धा शिवसेनेला मतदान करेल, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीच्या पराभवाचा खापर अपक्ष आमदारांवर फोडलं. त्यांनी काही आमदारांची जाहीरपणे नावेही घेतली होती. त्यानंतर, ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता राऊत यांच्या टिकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ईडी आमच्याकडे दिल्यास देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेला मत देतील, असेही राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या या विधानावरुन भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, फडणवीस यांनी राऊत हे दररोज जोकरासारखी हास्यास्पद विधानं करत असतात. त्यामुळे, त्याला जास्त महत्त्व देण्याची गरज वाटत नाही, असे म्हटले. तसेच, मी त्यांना जोकर म्हणत नाही, पण त्यांची विधानं ही जोकरासारखीच असतात, असेही त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण आणि राहुल गांधींच्या ईडी चौकशीच्या निषेधार्ह काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविरुद्ध पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी बोलताना फडणवीसांनी राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं.
LIVE | Interaction with media in Mumbai..#Maharashtra#media#presshttps://t.co/Jbk5KbDxlg
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 13, 2022
निलेश राणेंनी साधला निशाणा
''संजय राऊत दोन दिवसासाठी ईडी मागत आहेत. जसं 2 हजार उधार मागत्यात तसं. अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं,'' अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे.
संज्या राऊत दोन दिवसासाठी ईडी मागतोय जसा 2 हजार उदार मागतोय/... अशी भीक मागायची पद्धत बरी नव्हे, हे सगळं कमवावं लागतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 12, 2022
संदीप देशपांडे यांचीही टिका
संजय राऊतांच्या या विधानावरुन मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला आहे. अडीच वर्षे महाराष्ट्रात मुख्यमंत्री असून काही करू शकला नाहीत, ४८ तास ईडी घेऊन काय करणार?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. तसेच ईडी चालवायला पण अक्कल लागते "ढ"टीमचं काम नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत
४८ तासांसाठी ईडी आमच्या हातात दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. तसेच भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपाचा डाव आहे. मुंडे कुटुंबाच आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचे नातं आहे. आणि आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी असल्याचेही राऊत म्हणाले होते.