संविधानाचा विनाश म्हणजे संपूर्ण पिढीचा विनाश- कपिल सिब्बल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:21 IST2018-07-22T02:20:50+5:302018-07-22T02:21:22+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशरूपी परिवार तोडायला निघाल्याची टीका

संविधानाचा विनाश म्हणजे संपूर्ण पिढीचा विनाश- कपिल सिब्बल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हिंदुस्तान एक परिवार असून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडायला निघाले आहेत. शुक्रवारी त्यांनी केलेल्या भाषणात तिरस्कार आणि द्वेष होता. आपल्या देशाचे संविधान व देश वाचवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. म्हणूनच युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण देशभरात भारत बचाओ आंदोलन सुरू करण्यात आले आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री व खासदार कपिल सिब्बल यांनी युवक काँग्रेस आयोजित भारत बचाओ आंदोलनाच्या कार्यक्रमात केले.
कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, कृपाशंकर सिंह, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव, अखिल भारतीय युवक काँग्रेस व युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सिब्बल म्हणाले, आपल्या देशाची लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, आपले संविधान चुकीच्या लोकांच्या हातात गेले, तर देश तुटेल. हीच परिस्थिती सध्या देशात निर्माण झालेली आहे. चुकीच्या लोकांच्या हातात देश गेलेला आहे. नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कुठला रस्ता निवडला पाहिजे हेच मोदींना कळत नाही. सध्या भाजपा नाही तर आरएसएस देश चालवत आहे. आपल्या देशातील सर्व मोठमोठ्या संस्थांवर, सरकारी व्यवस्थांवर, सर्व विद्यापीठांवर व सर्व प्रमुख सल्लागारपदी म्हणजेच सर्व मोठमोठ्या पदांवर आरएसएसची माणसे बसलेली आहेत. आरएसएसचे लोक त्यांच्या शाखांमध्ये भगव्याला सलाम करतात. ते लोक देशाच्या ध्वजाला सलाम कसे करणार?, अशी घणाघाती टीका सिब्बल यांनी केली. युवक काँग्रेसतर्फे भारत बचाओ आंदोलन संपूर्ण देशभर सुरू झाले आहे. माणिकराव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.