‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 08:21 IST2026-04-08T08:20:21+5:302026-04-08T08:21:12+5:30

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे काम सुरू

Deputy CM Eknath Shinde will keep an eye on tunnel boring machine said CM Devendra Fadnavis | ‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस

‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याच्या कामाला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) लाँचिंगद्वारे औपचारिक सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणेकर असल्याने ते टीबीएमवर नजर ठेवतील. हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टिकुजिनीवाडी ते बोरीवली असा दुहेरी बोगदा आहे. प्रकल्पाची एकूण लांबी ११.८४ किमी असून, त्यामध्ये १०.२५ किमी लांबीचा मुख्य बोगदा आहे. बोरीवलीकडून ५.७५ किमी आणि ठाण्याकडून सुमारे ६.०९ किमी बोगदा खोदण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सध्याचा ९० मिनिटांचा प्रवास केवळ १५ मिनिटांत पूर्ण होईल. प्रकल्पासाठी नायक आणि अर्जुना अशी टीबीएम यंत्रे वापरण्यात येत आहेत. नायक हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील फुलपाखराच्या नावावरून, तर झाडाच्या नावावरून अर्जुना हे नाव देण्यात आले आहे.

हा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा व ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. २०२४ मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि आता कामाला सुरुवात झाली आहे. संजय गांधी उद्यानाखाली काम करताना पर्यावरणाची काळजी घेणे मोठे आव्हान होते, परंतु तंत्रज्ञानाच्या मदतीने ते शक्य होत असल्याचेही ते म्हणाले.

भविष्यात ठाणे कोस्टल रोडला जोडणार

बोगद्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, भविष्यात ठाणे कोस्टल रोडशी जोडणी झाल्यानंतर शहरातील वाहतूक बायपास होईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प संवेदनशील असून, जैवविविधतेवर कोणताही परिणाम होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. तोडण्यात आलेल्या सुमारे ११ हजार झाडांच्या बदल्यात तितक्याच प्रमाणात वृक्षारोपण केले जात असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रकल्प खर्च पाेहाेचला १८,८३८ काेटींवर

ठाणे बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाचा खर्च सुमारे १६ हजार कोटी रुपये अपेक्षित होता. मात्र निविदा प्रक्रियेनंतर या प्रकल्पाचा खर्च १८,८३८ कोटी रुपयांवर पोहचला. दरम्यान प्रकल्पाच्या कामासाठी २०२३ मध्ये कंत्राट देण्यात आले आहे. मात्र भुसंपादनाला विलंब झाला असून अद्यापही कामांनी अपेक्षित गती पकडली नाही. त्यातून प्रकल्पाच्या कामाला विलंब होण्याची चिन्हे असून त्यातून भविष्यात खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title : ठाणे के एकनाथ शिंदे टनल बोरिंग मशीन की निगरानी करेंगे: फडणवीस

Web Summary : ठाणे-बोरीवली सुरंग परियोजना का शुभारंभ सीएम फडणवीस ने किया। एकनाथ शिंदे परियोजना की निगरानी करेंगे, जिससे यात्रा का समय 15 मिनट कम हो जाएगा। लागत ₹18,838 करोड़ है। व्यापक वृक्षारोपण के साथ पर्यावरण की देखभाल को प्राथमिकता दी गई है।

Web Title : Thane's Eknath Shinde to Oversee Tunnel Boring Machine: Fadnavis

Web Summary : Thane-Borivali tunnel project launched by CM Fadnavis. Eknath Shinde will oversee the project, reducing travel time to 15 minutes. Cost is ₹18,838 crores. Environmental care is prioritized with extensive tree planting.