Join us  

'...म्हणून अजित पवार आग लागताच जीएसटी भवनाजवळ तातडीने पोहचले'; मनसेने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 1:30 PM

जीएसटी भवनात जीएसटीबाबत अनेक कागदपत्रांचा साठा असल्याने या आगीत सर्वच कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई: माझगांव येथील जीएसटी भवनच्या 8व्या मजल्यावर सोमवारी भीषण आग लागली होती. या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी नियंत्रण मिळविले. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, जीएसटी भवनात जीएसटीबाबत अनेक कागदपत्रांचा साठा असल्याने या आगीत सर्वच कागदपत्रे जाळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जीएसटी भवनाच्या आगीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळताच त्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली होती. यावर  अजित पवार जीएसटी भवनाला लागलेल्या आगी संदर्भातील कसून चौकशी करतील याची मला खात्री असल्याचे मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, अजित पवार हे खूप संवेदनशील आहे. तसेच राज्याला करोडो रुपयांचं महसूल मिळवून देणारं अर्थखातं असल्यामुळे अजित पवार आणि जीएसटी भवनच्या इमारतीचं खास नातं असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अजित पवार इतर कोणत्याही कामासाठी नेहमी आग्रही असल्याचे सांगत अजित पवार जीएसटी भवनाला लागलेल्या आगीची कसून चौकशी करतील असा विश्वास देखील बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला आहे.

आगीची माहिती मिळताच अजित पवार बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच आगीत किती नुकसान झाले आहे, त्याची माहिती घेतली जाईल. मी अधिकाऱ्यांना विचारले त्यांनी माहिती दिली की सर्व डेटा आपल्याकडे आहे. सर्व डाटा कॉम्प्युटराईज आहे. तसेच, मला माहिती देण्यात आली की, सर्व सुरक्षित आहे, असे अजित पवार म्हणाले. याशिवाय, अशा घटना घडता कामा नये. आपण मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा सूचना दिली होती की, सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीत करुन घ्या. यासंदर्भात तपास करण्याची जबाबदारी सरकार घेईल. तसेच जीएसटी भवनमध्ये लागलेल्या आगीची चौकशी होणार, असेही अजित पवार यांनी सांगितले होते. 

टॅग्स :राज ठाकरेअजित पवारमनसेमुख्य जीएसटी कार्यालयजीएसटीमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसबाळा नांदगावकर