डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 06:07 IST2025-07-02T06:07:00+5:302025-07-02T06:07:36+5:30

मुलुंडमध्ये आईसोबत राहणारी १५ वर्षीय मुलगी २४ जूनच्या संध्याकाळी  तिच्या १६ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी भांडूपच्या महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत आली होती.   

Dating dispute escalates, girl loses life; CCTV, witnesses provide direction for investigation | डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा

डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा

मुंबई : डेटिंगवरून झालेला वाद विकोपाला गेला आणि १५ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना भांडूप पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे. यात आरोपी असलेल्या १६ वर्षीय मुलाने इमारतीच्या टेरेसवरून ढकलून मुलीची हत्या करत आत्महत्येचा बनाव केला आणि गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. सदर मुलाला डोंगरी बालसुधारगृहात पाठविले आहे.

मुलुंडमध्ये आईसोबत राहणारी १५ वर्षीय मुलगी २४ जूनच्या संध्याकाळी  तिच्या १६ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी भांडूपच्या महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत आली होती.     मुलाने तिला डी विंग इमारतीच्या छतावर नेले. छतावरील पाण्याच्या टाकीजवळ दोघे गप्पा मारत असताना, मुलीने त्याला डेटिंगसाठी विचारले. दोघांमध्ये डेटिंगवरून वाद झाला. वादानंतर मुलाने तिला धक्का दिला. त्यात इमारतीवरून खाली पडून मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तो काही घडले नसल्याच्या आविर्भावात फिरला आणि घरी गेल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी मुलाने मुलीने अभ्यासाच्या तणावातून ३० -३१ मजल्याच्या मधील खिडकीतून उडी घेत आत्महत्या केल्याचे सांगितले होते; पण त्याने केलेला गुन्हा तो फार काळ लपवू शकला नाही.

भांडूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस आयुक्त जितेंद्र आगरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनास्थळावरून पुरावे ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजसह दोन्ही मुलांच्या मोबाइलची तपासणी सुरू केली. इमारतीच्या सुरक्षा रक्षकांसह रहिवासी, आरोपी मुलाचे आई-वडील, मुलीची आई, दोन्ही मुलांचे मित्र-मैत्रीण यांच्याकडे चौकशी केली. आरोपी मुलाची त्याच्या वडिलांच्या समक्ष २४, २८, २९ आणि ३० जून रोजी सखोल चौकशी करण्यात आली. २९ जून पर्यंत तो ‘मी काही केले नाही’ हेच सांगत होता.

असा झाला उलगडा...

खाली पडलेल्या मुलीचा मोबाइल ई विंग जवळ मुलांना सापडला. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या माहितीवरून हा तरुण खोटे बोलत असल्याचे स्पष्ट झाले, घटनेनंतरच्या संशयास्पद हालचालींमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. तपासात मुलानेच तो लांब फेकल्याचे उघड झाले. मुलीने इमारतीमध्ये प्रवेश करताना व्हिझिटर बुकमध्ये दीपाली नाव लिहून आरोपी मुलाचा मोबाइल नंबर नोंद केला होता. आरोपी मुलाने खाली आल्यानंतर तो नंबर आणि नोंदणी बुकमध्ये खाडाखोड केली होती. मुलाने दिलेला जबाब आणि रहिवाशांनी दिलेल्या जबाबाने मुलावरील संशय आणखी दाट झाला. चौकशीत घटनेच्या दिवशी दोघांमधील भांडणाचा आणि जोरात ओरडल्याचा आवाज ऐकल्याचे एका रहिवाशाने सांगितले. पायऱ्यांवरून धावत येणाऱ्या मुलाने आवाजाबाबत काही माहिती नसून आपण मित्राला भेटायला आल्याचे या रहिवाशाला सांगितले. हा जबाब आणि मुलाच्या जबाबातील तफावत याने अखेर याप्रकरणाचा उलगडा झाला. सोमवारी रात्री मुलाने गुन्ह्यांची कबुली दिली.

Web Title: Dating dispute escalates, girl loses life; CCTV, witnesses provide direction for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.