'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 21:45 IST2025-05-22T21:43:23+5:302025-05-22T21:45:04+5:30
Retired Cop Son Dies by Suicide In Mumbai: मुंबईच्या चुनाभट्टी भागात एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली.

'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
मुंबईच्या चुनाभट्टी भागात एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आत्महत्या केल्याने खळबळ माजली. आत्महत्या करण्याआधी मयत तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला एक व्हिडीओ सापडला. या व्हिडीओमध्ये त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला वैतागून आत्महत्या करत असल्याचे म्हटले. याप्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
मयत तरुणाच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, त्यांचा मुलगा आणि सून दोन वर्षाच्या नातीसह चुनाभट्टी येथील सरकारी निवासस्थानात राहत होते. दरम्यान, १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांच्या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. मुलावर यवतमाळ येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर दोन दिवसांनी ते पुन्हा चुनाभट्टी येथील निवासस्थानी परतले, तेव्हा त्यांना घरातील एका लोखंडी कपाटात मुलाने लपवलेला त्याचा मोबाईल सापडला.
आत्महत्या करण्याआधी मुलाने आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता, ज्यात त्याने असे म्हटले आहे की, 'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकाराला सोडू नका. आई आणि तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या.' या व्हिडिओ व्यतिरिक्त मोबाईलमध्ये एका सुसाईड नोटचा फोटोही सापडला, ज्यात मयत तरुणाने पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल सांगितले. हे ऐकल्यानंतर वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून त्याच्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्याच्या सून आणि तिच्या कथित जोडीदारावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करीत आहेत.