दिल्ली बॉम्बस्फोटाची भीती दाखवून माजी BMC अधिकाऱ्याला १६ लाखांना लुटले; सायबर गुन्हेगारांचा नवा पॅटर्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:51 IST2026-01-22T10:07:19+5:302026-01-22T10:51:59+5:30
Mumbai Cyber Crime: मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय निवृत्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढून ...

दिल्ली बॉम्बस्फोटाची भीती दाखवून माजी BMC अधिकाऱ्याला १६ लाखांना लुटले; सायबर गुन्हेगारांचा नवा पॅटर्न
Mumbai Cyber Crime: मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका ७५ वर्षीय निवृत्त मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढून लाखो रुपयांचा चुना लावला आहे. तुमचे नाव दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपींच्या यादीत आहे, अशी भीती दाखवून आरोपींनी या वृद्धाकडून १६.५० लाख रुपये उकळले आहेत. या घटनेमुळे मुंबईत पुन्हा एकदा सायबर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपींनी फसवणुकीसाठी थेट दिल्ली स्फोटाच्या घटनेचा वापर केल्याने तपासकर्त्यांनाही धक्का बसला आहे.
नेमकी कशी झाली फसवणूक?
११ डिसेंबर रोजी निवृत्त अधिकाऱ्याला एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने आपण दिल्ली अँटी टेररिस्ट स्क्वाडमधून बोलत असल्याचे सांगितले. "नुकत्याच झालेल्या दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासात तुमचे नाव समोर आले आहे," असे सांगून आरोपीने अधिकाऱ्याला धमकावण्यास सुरुवात केली. यामुळे पीडित व्यक्ती प्रचंड घाबरली.
'डिजिटल अरेस्ट' आणि खोटा व्हिडिओ कॉल
निवृत्त अधिकाऱ्याला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनी त्यांना एक मोबाईल ॲप इन्स्टॉल करायला लावले. त्यानंतर त्यांना एक व्हिडिओ कॉल आला, ज्यामध्ये समोरची व्यक्ती एनआयए ऑफिसर असल्याचा बनाव करत होती. "तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक असलेल्या एका बँक खात्यात मनी लाँड्रिंगद्वारे ७ कोटी रुपये आले आहेत," असा खोटा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली घातला गंडा
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि राष्ट्रीय सुरक्षेचे असल्याचे सांगून, याबद्दल कोणालाही माहिती देऊ नका, अन्यथा अटक होईल, अशी धमकीही दिली. घाबरलेल्या वृद्धाला विश्वासात घेण्यासाठी आरोपींनी सांगितले की, "तुमची गुंतवणूक आणि बँकेतील रक्कम कायदेशीर आहे की नाही, याची पडताळणी करावी लागेल. यासाठी सर्व पैसे दिलेल्या बँक खात्यात ट्रान्सफर करा. तुम्ही निर्दोष आढळल्यास हे पैसे परत केले जातील."
१६.५० लाख गेले आणि नंबर झाला ब्लॉक
तपास यंत्रणेला सहकार्य करण्याच्या उद्देशाने आणि अटकेच्या भीतीने वृद्धाने आरटीजीएसद्वारे वेगवेगळ्या खात्यांवर एकूण १६.५० लाख रुपये जमा केले. पैसे जमा होताच आरोपींनी आपला नंबर ब्लॉक केला. बराच वेळ झाला तरी पैसे परत आले नाहीत आणि संपर्कही तुटला, तेव्हा आपल्याला फसवले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सोमवारी पीडित वृद्धाने अंधेरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे.