'उद्योग क्षेत्रासाठी टास्क फोर्स उभारा, कंपन्यांनो कामगारांचं लसीकरण करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 06:34 PM2021-07-12T18:34:40+5:302021-07-12T18:36:13+5:30

उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.

'Create task force for industry, companies vaccinate workers', uddhav thackeray says | 'उद्योग क्षेत्रासाठी टास्क फोर्स उभारा, कंपन्यांनो कामगारांचं लसीकरण करा'

'उद्योग क्षेत्रासाठी टास्क फोर्स उभारा, कंपन्यांनो कामगारांचं लसीकरण करा'

Next
ठळक मुद्दे कोविडकाळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई - संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले. कोविड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये यादृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोविडकाळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार – कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण, निर्बंध कडक करावे लागले तरी आर्थिकचक्र सुरू ठेवणे, उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था (बायो बबल) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, आज सुमारे १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन राज्यात केले जाते. येणाऱ्या काळात कोविडचे आव्हान अधिक वाढले तर ऑक्सिजनची मागणी दुसऱ्या लाटेपेक्षा देखील अधिक भासू शकते. त्यामुळे ऑक्सिजन निर्मितीबरोबरच ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवणे, त्यासाठी टँक्स, सिलिंडरची आवश्यकता आहे. उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला २५ लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठ्या प्रमाणावर वापरला गेला पाहिजे.

छोट्या मोठ्या उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्यामाध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, कामांच्या पाळ्या अशारीतीने निश्चित कराव्यात की, गर्दी होणार नाही व कुठल्याच सुविधेवर ताण येणार नाही हे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले. डेल्टाच्या नव्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे अधिक काळजी घ्यावी लागणार असून अनेक देशांनी परत निर्बंध लावण्यास व काळजी घेण्यास सुरुवात केली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आणखी काही महिने तरी आपल्याला मास्क नियमित वापरणे, हात सातत्याने धुत राहणे, अंतर पाळणे व स्वच्छता ठेवणे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे लागणार आहे.
 

Web Title: 'Create task force for industry, companies vaccinate workers', uddhav thackeray says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.