Join us  

रोहित पवारांच्या टीकेवर पुण्यातून पलटवार; अजित पवारांचं 'दादा'स्टाईल प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 6:32 PM

महायुतीतील जागावाटपात सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहेत.

मुंबई - महायुतीतील जागावाटपावर तोडगा निघाला असून २८ मार्च रोजी महायुतीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी लोकसभा निवडणुकांवर भाष्य केले. बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवणार असून तुमच्या मनातील उमेदवार असेल, असे सूचक विधानही अजित पवार यांनी केले. यावेळी, त्यांनी नाव न घेता रोहित पवारांचा समाचार घेतला.

महायुतीतील जागावाटपात सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहेत. त्यावरुन, आमदार रोहित पवार सातत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर, नाव न घेता अजित पवारांवर हल्लाबोल करत आहेत. त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार यांनीही नाव न घेता दादास्टाईलने रोहित पवारांना सुनावलं. तसेच, जागावाटपातील खासदारांचं गणितही समजावून सांगितलं. 

''लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला केवळ तीन जागा मिळाल्या, असा गैरसमज काहीजणांकडून पसरवला जात आहे. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती. परंतु, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) २३ आणि शिंदे गटाचे १८ खासदार निवडून आले आहेत. या सर्व जागांवर आम्हाला पुन्हा उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मर्यादित जागा आल्या,'' असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसला जितक्या जागा मिळायला हव्यात त्या मिळण्यासाठी दोन्ही मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, महायुतीमधील जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, हे यादी जाहीर झाल्यानंतरच समजेल. 

रोहित पवारांनी केली होती टीका

एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता महाशक्ती कडून हळूहळू संपवला जातोय. आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील, असे म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली होती. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने जागावाटपात अजित पवार गटाला कमी जागा मिळत असल्यावरुन टीका केली जात आहे.

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवारभाजपालोकसभा निवडणूक २०२४