Coronavirus : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह २0 शहरांचे व्यवहार थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:26 AM2020-03-21T07:26:22+5:302020-03-21T07:27:03+5:30

शुक्रवारी मध्यरात्रीपासून या शहरांतील व्यवहार ठप्प झाले आहेत. खासगी कंपन्यांची कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Coronavirus: Transaction of 20 cities including Mumbai, Pune, Thane and Nagpur was stopped | Coronavirus : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह २0 शहरांचे व्यवहार थांबले

Coronavirus : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसह २0 शहरांचे व्यवहार थांबले

Next

मुंबई : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतील शहरांसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांमधील, सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केला.

त्यानुसार, शुक्रवारी मध्यरात्रीपासून या शहरांतील व्यवहार ठप्प झाले आहेत. खासगी कंपन्यांची कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आता २५ टक्क्यांवर आणली आहे. कालपर्यंत ती ५० टक्के होती.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असून, जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, दुकाने उघडी असल्याने बाजारपेठेतील गर्दी अजून कमी झालेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधी दुकाने वगळता मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड व नागपूर शहरातील सर्व खासगी व्यापारी आस्थापने शुक्रवारी रात्री १२ पासून बंद करण्यात येत आहेत.

ही शहरे ३१ मार्चपर्यंत बंद
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, मीरा-भार्इंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, खोपोली, पेण, पनवेल, अलिबाग, उरण, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड. या शहरांतील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

खासगी रुग्णालये सुरूच
खासगी रुग्णालये मात्र सुरू राहातील, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. दुकानदारांनी त्यांच्या कामगारांच्या वेतनात कपात करू नये, तसेच या ‘बंद’बाबत काही शंका असल्यास विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अथवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द-शिक्षणमंत्री
शालेय विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, ९ वी व ११ वीची उर्वरित परीक्षा १५ एप्रिल नंतर घेण्यात येणार आहे. मात्र, दहावीची परीक्षा वेळापत्रकानुसार होईल.
दहावीच्या परीक्षेसंबंधित आवश्यक ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वगळता इतरांना घरून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. -वृत्त/७

Web Title: Coronavirus: Transaction of 20 cities including Mumbai, Pune, Thane and Nagpur was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.