Join us

CoronaVirus News: जितेंद्र आव्हाड पुन्हा ऍक्टिव्ह; कोरोनावर मात केल्यानंतर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 11:39 IST

Coronavirus Latest Marathi News: जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिचार्ज देण्यात येणार आहे.

मुंबई: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील कोरोनावर मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिचार्ज देण्यात येणार आहे. यासंबंधित माहिती स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.

जितेंद्र आव्हाज पुढे म्हणाले की, माझ्यावर यशस्वी उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड येथील सर्व डॉक्टर्स ,नर्सेस ,वॉर्डबॉय आणि इतर सर्व हॉस्पिटल स्टाफ यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन त्यांना मनापासून धन्यवाद. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी पत्नी आणि मुलगी यांच्या प्रेमाची ताकद माझ्या पाठीशी होती असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटद्वारे सांगितले.

दरम्यान, जवळचे काही सहकारी, सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं आव्हाड यांनी लगेचच कोरोना चाचणी केली होती. ती 'निगेटिव्ह' आली. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून, 13 एप्रिलपासून त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलं होतं. त्यांनी स्वतःच ट्विटरवरून ही माहिती दिली होती. मात्र, दोन दिवसांनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर, पुन्हा चाचणी केली असता, आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अखेर कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते आणि आव्हाड यांच्या सर्व पक्षीय मित्रपरिवाराने समाधान व्यक्त केले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्र सरकार