Join us  

Coronavirus: ‘उद्धव व्हायरस’पेक्षा कोरोनाबाबत आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघणं चांगलं’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:36 PM

कोरोनावरुन भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी केलेल्या पोस्टवरुन वादंग निर्माण झालेलं असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला हाणला आहे

मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेला कोरोना व्हायरसचा जगभरात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे जीव गेला. तर २ लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रतही कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ वर पोहचली आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढत असताना राजकीय वातावरणही पेटलं आहे.

कोरोनावरुन भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी केलेल्या पोस्टवरुन वादंग निर्माण झालेलं असताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेला टोला हाणला आहे. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, कोरोना व्हायरसबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. ही पत्रकार परिषद संजय राऊत यांच्या उद्धव व्हायरस राज्यात येणार यापेक्षा चांगली आहे असा चिमटा काढला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना नेते संजय राऊत हे रोज सकाळी माध्यमांशी संवाद साधायचे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचं सरकार येईपर्यंत राऊत यांची पत्रकार परिषद माध्यमांसाठी मेजवानी ठरली होती. अनेकदा या पत्रकार परिषदेवर भाजपा नेत्यांनी टीकास्त्र सोडलं. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या निमित्ताने भाजपाने शिवसेनेला चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. कोरोनाबाबत जनजागृती आणि माहिती देण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे नियमित पत्रकार परिषद घेत असतात. यामुळे लोकांना माहिती मिळत असते ही पत्रकार परिषद बघणे चांगले आहे असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कामाचं महाराष्ट्रातून कौतुक होतंय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, टोपे यांना आईला भेटायलाही वेळ मिळत नाही. रोजच्या कामातून अवघी काही मिनिटं त्यांना आईसाठी मिळतात. त्यांचा बाकीचा दिवस कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात, उपाययोजनांचा, राज्यातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात जातो. मात्र, कौटुंबिक जबाबदारीपेक्षा टोपेंनी राज्याच्या जनतेच्या जबाबदारीला प्राधान्य दिलंय. टोपेंच्या या संवेदनशीलतेचंही कौतुक होत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले आमदार निरंजन डावखरे यांनी ट्विट केल्याने अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका झाली होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेनीतेश राणे भाजपामहाराष्ट्रात कोरोना व्हायरससंजय राऊत