Coronavirus: दोन किमी अंतराच्या नियमाने खोळंबा; सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 01:39 AM2020-06-30T01:39:39+5:302020-06-30T01:39:59+5:30

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना

Coronavirus: Detention at a distance of two km; Queues of vehicles on all major roads | Coronavirus: दोन किमी अंतराच्या नियमाने खोळंबा; सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

Coronavirus: दोन किमी अंतराच्या नियमाने खोळंबा; सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

Next

मुंबई : कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मुंबईत राहत्या ठिकाणापासून दोन किमी परिघाबाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांकडून तपासणी सुरू होती. परिणामी सोमवारी सकाळी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि सायन-पनवेल मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान हजारो कामगारांना आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राहत्या ठिकाणांपासून २ किमीच्या परिसराबाहेर विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला होता. त्याची रविवारपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे.

सोमवारी सकाळी प्रत्येक वाहनांची पोलीस तपासणी करत होते. सकाळी भार्इंदर ते दहिसर चेकनाका या प्रवासासाठी तब्बल दोन तास लागले. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर मुंबई-ठाण्यात प्रवेशाच्या आणि एक्झिट पॉइंटवर पोलिसांकडून कठोर तपासणी सुरू होती. पोलिसांकडून दहिसर येथे तपासणी सुरु असल्याने ठाणे घोडबंदरपर्यंत वाहनांची मोठी रांग लागली होती. कासवाच्या गतीने वाहने पुढे सरकत होती. तसेच सायन पनवेल मार्गासह मुंबईतील प्रमुख रस्त्यांवरही वाहतुकीचा चांगला खोळंबा झाला होता.

समाजमाध्यमाद्वारे रोष व्यक्त केला
योग्य कारण आणि सर्व परवानग्या असूनही तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला. या मूर्खपणाच्या निर्णयामुळे लोकांना मन:स्ताप सहन करावा लागला असे टिष्ट्वट समित मेहता यांनी केले. तर माझा भाऊ वैद्यकीय कंपनीत आवश्यक असणाºया मशीनचे भाग तयार करणाºया युनिटमध्ये काम करतो, त्याला आज पोलिसांनी अडविले. दुचाकीवर कामाला जाऊ शकत नाही असे सांगितले. ही तर पूर्णपणे छळवणूक आहे असे विजय मणानी यांनी म्हटले आहे.

एसटी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका एसटीच्या प्रवाशांना बसला. या कोंडीत एसटीच्या बस रस्त्यात अडकून राहिल्याने एसटी आगारात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली होती. परिणामी कामावर जाण्यासाठी निघालेल्या नागरिकांना तासन् तास बसस्टॉप आणि आगारात बसची वाट बघावी लागली. बराच वेळ बस आगारात न आल्याने काही प्रवाशांनी वैतागून नालासोपारा आगारात गोंधळ घातला. तब्बल तीन तासांनंतर मुंबईकडे जाणारी बस सोडण्यात आली.

पोलीस ठाण्यातले आवारही कमी पडले
विविध कारवाईत जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात येत असताना, काही ठिकाणी ही जागा कमी पडल्याने मोकळे रस्ते, मैदाने, उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत वाहने ठेवण्यात येत असल्याचेही पाहावयास मिळाले.

लॉकडाऊन दरम्यान कारवाई सुरूच राहणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारे धडक कारवाईचे सत्र सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.

पोलिसांना पाहून ‘यू टर्न’
पोलिसांना पाहून विनाकारण बाहेर फिरणाºया दुचाकीस्वारांनी यु टर्न घेतलेलाही बघायला मिळाला. यात ट्रिप्पल सीट फिरणारेही होते. गोवंडी, शिवाजीनगर, मानखुर्द भागात दुचाकी स्वारांमुळे पोलिसांची दमछाक झाली.

ओळखपत्र नसल्याने तारांबळ
ठाणे येथून मुलुंडच्या रुग्णालयात कामासाठी दुचाकीवरून निघालेले काही कर्मचारी ओळखपत्र घरीच विसरल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. अहो, मी खरेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहे, हे पटवून देताना त्यांचा वादही झालेला दिसून आला. तासाभराच्या गोंधळानंतर आयडी आणायला पुन्हा घर गाठावे लागले. तर काहींनी तेथेच वाद घालत रुग्णालय अधिकाºयांशी बोलणे करून दिल्यानंतर त्यांना मुंबईत प्रवेश मिळाला.

Web Title: Coronavirus: Detention at a distance of two km; Queues of vehicles on all major roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.