Corona Virus: राज्यात १५ जण निरीक्षणाखाली; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 06:51 IST2020-03-08T01:45:11+5:302020-03-08T06:51:17+5:30
२३० प्रवासी कोरोना निगेटिव्ह नागरिकांनी गर्दी होणारे सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन, पुणे व नागपूर विमानतळावरदेखील स्क्रीनिंग सुरू

Corona Virus: राज्यात १५ जण निरीक्षणाखाली; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात होणारी गर्दी टाळण्याचे देखील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सध्या १२ जण मुंबईत तर ३ पुणे येथे भरती आहेत, राज्यात निरीक्षणाखाली १५ जण आहेत. २३० जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९३ विमानांमधील ९६ हजार ४९३ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व कोरोनाबाधित देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्यात पुणे व नागपूर विमानतळावरदेखील स्क्रिनिंग सुरू झाले आहे. आतापर्यंत राज्यात बाधित भागातून ५३२ प्रवासी आले आहेत.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत २४२ जण भरती आहेत. त्यापैकी २२९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल आज प्राप्त होतील. आजवर भरती झालेल्या २४५ प्रवाशांपैकी २३० जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.