मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:33 IST2025-11-19T16:28:51+5:302025-11-19T16:33:17+5:30
Mumbai Crime: मुंबई उपनगरामध्ये एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेत व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे.

मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
मुंबईत एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. बांधकाम व्यावसायिक कारमध्ये बसलेला असताना गोळीबार करण्यात आला. त्यात दोन गोळ्या व्यावसायिकाच्या पोटात लागल्याची माहिती आहे. कांदिवली चारकोप परिसरात ही घटना घडली आहे. व्यावसायिकाची प्रकृती गंभीर आहे.
फ्रेंडी दिलीमा भाई असे गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. कांदिवली चारकोप परिसरात असलेल्या बंदर पाखाडी येथील पेट्रोल पंपासमोर बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रेंडी दिलीमा भाई हे कारमध्ये बसलेले होते, त्याचवेळी दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दोन-तीन राऊंड फायर करण्यात आले आहेत. दोन गोळ्या फ्रेंडी भाई यांच्या पोटात घुसल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच चारकोप पोलीस आणि पोलीस उपायुक्तही गोळीबार झालेल्या ठिकाणी आले. ज्या ठिकाणी हा गोळीबार करण्यात आला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू करण्यात आले आहे.
फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलवण्यात आले होते. सध्या पोलीस गोळीबार करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.