Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉंग्रेस आज ३ वाजेपर्यंत वाट पाहणार; ॲड. आंबेडकर म्हणतात, उपयोग काय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 08:28 IST

सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यासाठी जिथे मतदान आहे, तिथे अर्ज मागे घेण्याची मुदत आहे

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीबरोबर घेण्यासाठी काँग्रेसच्या प्रयत्नांना यश येणार की नाही हे आज, सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. आंबेडकरांना काँग्रेसने तीन दिवसांपूर्वी नवी ऑफर दिली आहे. ही ऑफर देताना दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत आंबेडकरांनी प्रतिसाद द्यावा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यासाठी जिथे मतदान आहे, तिथे अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे काँग्रेस आंबेडकरांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहे. आम्हाला मतविभाजन नको आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचविण्याची गरज आहे. त्यामुळेच आम्ही वारंवार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे प्रस्ताव देत आहोत. वंचितला काँग्रेसच्या कोट्यातील दोन जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव दिला आहे, असे तीन दिवसांपूर्वी पटोले यांनी सांगितले होते.

अकोल्याचा उमेदवार मागे घेण्याची तयारी?आंबेडकर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव मान्य करत महाविकास आघाडीबरोबर येण्याचा निर्णय घेतल्यास अकोल्यात आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची तयारीही काँग्रेसने ठेवल्याचे समजते. अकोल्यातून काँग्रेसने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर आंबेडकरांनी वंचिततर्फे अर्ज दाखल केलेला आहे.

कॉंग्रेसचा हा प्रस्ताव म्हणजे वराती मागून घोडे आहे. वरात निघून गेलेली असते मग घोड्यांचा उपयोग काय आहे. आम्ही सर्व जागा अंतिम करत आलेलो आहोत, दोन दिवसात त्या जाहीर करणार आहोत.- प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

टॅग्स :काँग्रेसवंचित बहुजन आघाडीप्रकाश आंबेडकरलोकसभा निवडणूक २०२४