मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसने ‘मुंबईनामा’ नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर अदानीचा धारावी प्रकल्प रद्द करून नवीन धारावी पुनर्वसन प्रकल्प रहिवाशांच्या इच्छेचा आदर करून राबविला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. या प्रकल्पात ५०० चौरस फुटांचा भूखंड, आर्थिक वापरासाठी जागा तसेच धारावीत निर्यात प्रधान केंद्र निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
मुंबईतील ५० हजारांपेक्षा जास्त गृहनिर्माण सोसायट्यांसाठी प्रलंबित कब्जा प्रमाणपत्रे सहा महिन्यांत देणार, विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात गृहनिर्माण सोसायट्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करून पाच टक्के करण्याचा ठराव पास करणार, एसआरए योजना सोपी करणार, महाराष्ट्रात वास्तव्य असणाऱ्या स्थानिक रहिवाशांना मुंबईतील नोकऱ्यात प्राधान्य देणार, बीएमसी शाळांचे मजबुतीकरण अशी विविध आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड व अनेक नेते उपस्थित होते.
जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
-मविआचे सरकार येताच मुंबई पालिकेच्या निवडणुका १०० दिवसांत घेतल्या जातील.-तसेच भाजप सरकार व पालकमंत्र्यांनी तीन वर्षांच्या काळात बीएमसीचा निधी अन्यायकारकपणे वाटप केला, त्यावर श्वेतपत्रिका काढून चौकशी केली जाईल. -झोपडपट्टी व मुलींच्या शाळांमध्ये १ रुपयात सॅनिटरी नॅपकीन मिळणारे व्हेंडिंग मशीन -महिलांसाठी वन स्टॉप क्रायसिस सेंटर, महिलांसाठी सुरक्षित व परवडणारी वसतिगृहे-हाताने होणारी साफसफाई थांबवून स्वयंचलित ड्रेन सफाई तंत्रज्ञान व कौशल्य विकास केंद्र स्थापणार-बुद्ध विहारांना निधी दिला जाणार-ससून व माझगाव बंदरासह वरळी व वांद्रे येथे मत्स्य उत्पादन विपणन परिषदेची स्थापना, मच्छीमारांचे ५ लाखांचे कर्ज माफ -कोळीवाड्यातील गावठाण क्षेत्राची विकासकामे प्राधान्याने हाती घेणार.-मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात एक-एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार.