‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 22:10 IST2025-12-05T22:09:41+5:302025-12-05T22:10:19+5:30
Uddhav Thackeray News: दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘मत चोरी’विरोधातील महारॅली आयोजित करण्यात आली आहे.

‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
Uddhav Thackeray News:काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. दिग्विजय सिंह यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केल्यानंतर प्रथमच काँग्रेसचे बडे नेते मातोश्रीवर गेल्याने या नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे समजते.
महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्रित लढविण्याची शक्यता आहे. तसेच, राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबत उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्याला काँग्रेसचा विरोध आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी मातोश्रीवर जाऊन घेतलेली उद्धव ठाकरेंची भेट महत्त्वाची मानली जात आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर मतचोरी विरोधात काँग्रेसची एक महारॅली होत असून, या रॅलीत सहभागी होण्याचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आल्याचे समजते. या रॅलीत उद्धव ठाकरे सामील होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात काही कयास बांधले जात आहेत. १४ डिसेंबर रोजी काँग्रेसची ही महारॅली होणार आहे.
उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार का?
दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या ‘मत चोरी’विरोधातील महारॅलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना निमंत्रण देण्यात असल्याचे म्हटले जात आहे. या महारॅलीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. महाविकास आघाडीबरोबरच इंडिया आघाडीची मोट पुन्हा बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या निमंत्रणाचा स्वीकार करून दिल्लीला जाणार का, याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते, त्यामुळे या वेळीही ते जातील असा कयास बांधला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांत ठाकरेबंधू एकत्र येणार असल्याने काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत निर्माण झालेला दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबाबत काँग्रेसमध्येच दोन गट असल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत मुंबई मनपा निवडणूक लढवावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून दिग्विजय सिंह यांची ही भेट असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून मात्र राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबत ठाम असल्याचे सांगण्यात आल्याचेही समजते.