धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:55 IST2022-04-18T12:53:04+5:302022-04-18T12:55:34+5:30

राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे.

Congress leader Nana Patole has criticized MNS chief Raj Thackeray | धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई- आगामी ५ जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याची घोषणा मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली आहे. तसेच १ मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी औरंगाबादमध्ये मनसेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती देखील राज ठाकरे यांनी रविवारी दिली. 

राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे. राज ठाकरे भाजपाची सुपारी घेऊन भाषण करत आहेत. धार्मिक आस्थेचा बाऊ करणं चुकीचं आहे, असं नाना पटोले म्हणाले. तसेच धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचं आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या सभांवर बंदी घाला, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

राज ठाकरेंनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.

मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही- राज ठाकरे

"आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.

भोंग्याचा त्रास मुस्लिमांनाही- राज ठाकरे

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय."

Web Title: Congress leader Nana Patole has criticized MNS chief Raj Thackeray