५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:09 IST2025-07-02T17:08:19+5:302025-07-02T17:09:53+5:30
Congress Atul Londhe News: ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का, याबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
Congress Atul Londhe News: सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धवसेनेच्या विजयी मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ अखेर निश्चित झाली. शनिवार, ५ जुलै रोजी वरळीच्या एनएससीआय डोम येथे हा मेळावा होणार आहे. मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे हे २० वर्षानंतर एकाच व्यासपीठावर दिसतील. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याकडे 'ठाकरे ब्रँड'चे शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे. परंतु, ठाकरे बंधूंच्या या विजयी मेळाव्यात सहभागी होणार का, याबाबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.
पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरुद्ध मनसे आणि उद्धवसेनेने भूमिका घेतल्यानंतर सरकारला याबाबतचे दोन शासन निर्णय मागे घ्यावे लागले. हा विजय राजकीय पक्षांचा नसून मराठी जनतेचा असल्याचे राज आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी महापालिका निवडणुकीत हा विषय 'एनकॅश' करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होऊ शकतात, अशी चर्चा आहे. दोन्ही ठाकरे हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी महापालिका निवडणुकीत ते एकत्र दिसतील का? याबाबत उत्सुकता कायम आहे. यातच ५ जुलै रोजी होणाऱ्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण नसल्याचे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. याबाबत काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याबाबत बोलताना अतूल लोंढे म्हणाले की, आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आलेले नाही. कदाचित हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असू शकतो. ५ जुलै हा मोर्चा काढण्यासाठी दिवस ठरला होता. पण हा जीआर रद्द झाला आहे असे मला अजूनही वाटत नाही. कारण नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. त्यामुळे ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ या भाजपाच्या नितीपासून जपून राहणे आवश्यक आहे. ५ जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनसेचे संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक पोस्ट टाकली. 'आवाज मराठीचा! मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं...! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजतगाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या!! आम्ही वाट बघतोय...! आपले नम्र राज ठाकरे-उद्धव ठाकरे.' या पोस्टद्वारे मेळाव्यासाठी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे.