Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांच्या राजकारणाची तुलना थेट पाकिस्तानशी, डोकं चक्रावलं; न्यायालयात 'हे' घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 09:03 IST

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी शरद पवार यांच्या पक्षाच्या नावाचे साधर्म्य असल्यामुळे त्यांना हे नाव नाकारण्यात यावे, अशी मागणी अजित पवार यांच्या वतीने करण्यात आली. पण, तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयात न्यायालयाने काही बाबी नमूद केल्या असून हाच दाखला देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडअजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे, असे आदेश न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या तीन सदस्यीय पीठाने निवडणूक आयोगाला दिले. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाडसर्वोच्च न्यायालयात हजर होते. या सुनावणीवेळी न्यायालयाने महत्त्वाच्या बाबी नोंदवत अजित पवार गटाला फटकारलं. त्याच पार्श्वभूमीवर, आव्हाड यांनी न्यायालयाच्या नोंदीचा दाखला देत अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला. आव्हाड यांनी ट्विटरवरुन आपली प्रतिक्रिया दिली.  

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दिल्लीतून विमान पकडून आताच मुंबईत आलो. प्रवासातील दोन तासात डोकं चक्रावून गेलं होतं. आज जे काही सर्वोच्च न्यायालयात घडलं, अन् सुनावणी दरम्यान जे काही दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं. ते यातना देणारं होतं. महाराष्ट्रात अजित पवार यांनी केलेल्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी थेट पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली, असे  म्हणत पक्ष व चिन्हासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. 

शरद पवारांना संपवण्यासाठी...

एखाद्याला जर जनाची नव्हे तर मनाची लाज असेल तर आपण केलेले कृत्य हे सर्वोच्च न्यायालयाने मारलेली थापड आहे, हे ओळखून राजीनामा देईल. पण, शरद पवार यांना संपवण्यासाठी ज्या पातळीवर हे लोक घसरले आहेत. त्यांच्याकडून अशी अपेक्षाच ठेवणे चुकीचे आहे. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाचे स्वरूप पाकिस्तानातील राजकारणाशी समरूप साधतंय, हे दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं, हे मराठी माणूस म्हणून मला खूपच खेदजनक वाटतंय, असेही आव्हाड यांनी म्हटले. 

निर्णयानंतर काय म्हणाले शरद पवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभदिनी, निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला. हा मतदारांचा विजय आहे, असे शरद पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कमी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकिटावर उमेदवार लढले त्याचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :अजित पवारजितेंद्र आव्हाडसर्वोच्च न्यायालयराष्ट्रवादी काँग्रेस