Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्याचा दौरा चक्रीवादळापेक्षा वेगवान, मनसेची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 12:43 IST

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही टीका करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. 

ठळक मुद्देतौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा थोडक्यात आटोपला. त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली

मुंबई - रविवारी आलेल्या तौक्ते वादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Tauktae Cyclone) या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी शुक्रवारी कोकणचा दौरा केला. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसही गेल्या दोन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी केलेल्या धावत्या दौऱ्यावरुन त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मनसेच नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचा दौरा वेगवान असल्याची टीका केली आहे. 

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा थोडक्यात आटोपला. त्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली. त्यात ते म्हणतात. ‘’यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, मुख्यमंत्री आले, पण त्यांनी कुठल्याही गावाला भेट दिली नाही. मोजून दहा किलोमीटरच्या आतच विमानतळावरचा आढावा घेत हा दौरा संपला, असे टीका भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यानंतर, आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही टीका करत मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय.  मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळालाही लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C.M. असे म्हणत मनसेनं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर बोचरी टीका केलीय. 

आढावा घेऊन मदत केली जाईल

तौक्ते चक्रीवादळाने नेमके किती नुकसान झाले याबाबतचे पंचनामे पूर्ण होऊ द्या, संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल, कुणीही वंचित राहणार नाही, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे दिले होते. तर सागरी किनारपट्टीच्या भागात  कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत घ्यावी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी कोकण दौऱ्यात सांगितले. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आणि सिंधुदुर्गातील काही भागात जाऊन पाहणी केली.  

टॅग्स :मनसेतौत्के चक्रीवादळमुख्यमंत्रीउद्धव ठाकरे