Uddhav Thackeray: MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 14:32 IST2022-03-20T14:31:09+5:302022-03-20T14:32:21+5:30
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या युतीच्या प्रस्तावाबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

Uddhav Thackeray: MIMची महाविकास आघाडीला युतीची ऑफर; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीशी युती करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. यातच महाविकास आघाडीतील महत्त्वाचा आणि मोठा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून यासंदर्भात प्रतिक्रिया आली आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, यावेळी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंनतर आता राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. जलील यांच्या प्रस्ताव महाविकास आघाडीने अमान्य केला असला तरी मात्र ते आग्रही आहेत. जलील यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यातच शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे.
शिवसेनेचे हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवा
शिवसेनेचे हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. भाजपचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना सांगितले.
शिवसेनेला बदनामी करण्याची सुपारी दिली
भाजपने एमआयएमला शिवसेनेला बदनामी करण्याची सुपारी दिली आहे. काही झाले तरी एमआयएमसोबत युती होणार नाही. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही. हा भाजपाच्या व्यापक कटाचा भाग असल्याचा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला.