लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 05:40 IST2025-07-30T05:38:59+5:302025-07-30T05:40:21+5:30
महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आतापर्यंत योजनेच्या लाभार्थींची झालेली छाननी आणि विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली.

लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लाडकी बहीण योजनेचा फायदा पुरुषांनी कसा घेतला, सरकारची अशी फसवणूक झाली असेल तर ती गंभीर बाब असून कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘लोकमत’ने या योजनेतील गडबडींवर गेले काही दिवस प्रकाश टाकला आहे. या योजनेच्या निकषांमध्ये बसणारी एकही महिला योजनेपासून वंचित राहता कामा नये पण त्याचवेळी पात्र नसलेल्यांना लाभ मिळता कामा नये याकडेही लक्ष दिले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आतापर्यंत योजनेच्या लाभार्थींची झालेली छाननी आणि विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली.
...तर वसुली करणार
मंत्री तटकरे यांनी माध्यमांना सांगितले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाईल.२६ लाख लाभार्थी महिलांचा डाटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिला आहे. आता त्यात अपात्र किती याची छाननी केली जात आहे. मात्र, २६ लाख महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या, हा बोलवा खरा नाही.
पुरुषांच्या नावे खाते, छाननी सुरू
साडेचौदा हजार पुरुषांनी योजनेचा लाभ उचलल्याच्या वृत्ताबाबत अदिती तटकरे म्हणाल्या की, त्याचीही छाननी सुरू आहे. काही महिलांची बँक खाती नसतील अशावेळी घरच्या पुरुषाच्या नावे असलेल्या बँक खात्यात त्यांचा लाभ जमा झाला असण्याची शक्यता आहे. ही बाब आम्ही तपासून पाहत आहोत. सरकारी कर्मचारी महिलांनी नियमबाह्य लाभ घेतला असेल तर वसुली केली जाईल, हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आधीही स्पष्ट केले आहे. विरोधकांना योजना खुपते आहे, त्यामुळे ते टीका करतात पण महिला खूश आहेत, असेही तटकरे म्हणाल्या.