Join us  

'...तर अडचण होऊ शकते'; अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर शिंदे सरकारचं लगेच 'एक पाऊल मागे'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 7:42 PM

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्या काळातील कामांना शिंदे सरकार स्थगिती देत असल्याने टीका करण्यात येत होती.

मुंबई- राज्यात स्थापन झालेल्या शिंदे सरकारकडून मागच्या कामांना स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे. मात्र असं करण्याचं काहीच कारण नव्हतं. वास्तविक ही प्रक्रिया आहे. सरकार येत असतात आणि जात असतात. आता हे दोघे आलेत ते ताम्रपट घेऊन आलेत काय? हेही कधीतरी जाणारच आहेत, अशी टीक विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली होती. 

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी त्यांच्या काळातील कामांना शिंदे सरकार स्थगिती देत असल्याने टीका करण्यात येत होती. याचपार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत स्थगित निर्णयासंबधी पुन्हा विचार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. 

पालापाचोळा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, या पालापाचोळ्यानेच...

महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या कॅबिनेट बैठकींमधील सर्व निर्णय रद्द करण्यापासून ते मोठ-मोठे निर्णय स्थगित करण्यास शिंदे सरकारने सुरुवात केली आहे. मात्र स्थगितीची प्रकरणे वाढली तर कोर्ट केसेस ही मोठ्या प्रमाणावर वाढतील असं अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. यानंतर स्थगिती दिलेल्या कामांचा मुख्य सचिव पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

मागील सरकारने शेवटी शेवटी घाईघाईत, घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. जनतेशी संबंधित आवश्यक अशा कामांना स्थगिती नससल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकार अल्पमतात आल्यानंतर काढलेल्या जीआरला स्थगिती देण्यात आली आहे. विनाकारण पैसे कुठेही खर्च होऊ देणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

'कुणीही अडवण्याचं कारण नाही'; उद्धव ठाकरेंना शहाजीबापू पाटलांनी दिलं प्रत्युत्तर

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील नियोजित स्मारकाच्या कामालाही स्थगिती दिल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांसारख्या माणसाने असा आरोप करताना फाईलवर काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे होतं. मी स्वत:च्या हस्ताक्षरात फाईलवर लिहिलंय की, या कामाला स्थगिती देणं योग्य होणार नाही. उलट या संदर्भात काय काय कामं घेतली आहेत. त्यासंदर्भातील सादरीकरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर करावं. त्यात काही कामं राहिली असतील तर त्याचाही समावेश करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवारमहाराष्ट्र सरकार