BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:21 IST2025-12-24T14:18:53+5:302025-12-24T14:21:17+5:30
Chandrashekhar Bawankule On Shiv Sena UBT and MNS Alliance: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या घोषणेनंतर ठाकरे बंधूंवर बोचरी टीका केली.

BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली उद्धवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती अखेर बुधवारी अधिकृतपणे जाहीर झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू मुंबईसह सात महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकत्र लढणार आहेत. या युतीच्या घोषणेनंतर महायुतीचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली असून, ही युती म्हणजे पक्ष संपलेल्या लोकांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतःच आपले पक्ष संपवले आहेत, म्हणूनच आज त्यांच्यासोबतचे अनेक विश्वासू सहकारी त्यांना सोडून गेले आहेत. इतरांवर आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षातील आमदार आणि तळागाळातील कार्यकर्ते आपल्याला सोडून का गेले, याचा विचार त्यांनी करायला हवा. आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची परिस्थिती इतकी बिकट आहे की, त्यांना नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारही मिळत नाहीत."
बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांवरूनही निशाणा साधला. ठाकरेंनी त्यांच्या संपूर्ण पत्रकार परिषदेत विकसित मुंबईबद्दल एकही शब्द उच्चारला नाही. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी आणि विकासाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्राची जनता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र धोरणावर विश्वास ठेवते आणि त्याच आधारावर मतदान करेल. मुंबई तोडणार किंवा मतचोरी यांसारखे जुने आणि भावनिक मुद्दे उपस्थित करून आता काहीही उपयोग होणार नाही. मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता सुजान असून ती आता केवळ विकासाच्या पाठीशी उभी राहील.
संजय राऊत यांनी उत्तर भारतीयांना मुंबईकर म्हणण्याच्या विधानावर बावनकुळे यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, "येत्या १५ तारखेला मतदान आहे, म्हणूनच राऊतांना आता उत्तर भारतीयांची आठवण झाली आहे. आतापर्यंत त्यांनीच उत्तर भारतीयांना नेहमी डिवचले आणि त्यांच्यामुळे मुंबई खराब झाली असा आरोप केला,आता मतांसाठी ते दिवसाला रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे बोलत आहेत."
तसेच, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही सर्व मराठीच आहोत. आमचा जन्मही याच मातीत झाला आहे. 'मराठी-मराठी' करून तुम्ही मराठी भाषेचा आणि वीर सावरकरांचा अपमान केला आहे. खोटारडेपणा करून आता सत्ता मिळणार नाही." चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेवटी दावा केला की, "यंदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी मते मिळतील. जनता भावनेच्या आधारावर नाही, तर ठोस कामाच्या जोरावर मतदान करणार असून देवेंद्र फडणवीस हेच मुंबईचा विकास करू शकतात, हे जनतेला माहित आहे."