Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरवरून ठाकरे बंधूंच्या एकीत मिठाचा खडा? मनसे-उद्धवसेना आमने-सामने; नेते भिडले, खडाजंगी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:11 IST

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर येथे उद्धवसेनेने पाठिंबा दिल्याने भाजपाचा महापौर झाला. यावरून आता मनसे आणि उद्धवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीने महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविले. भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान ३२ मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने दानव यांची निवड झाली. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे की, उद्धवसेनेच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा मोठा दावाही संदीप देशपांडे यांनी केला. तसेच खासदार संजय राऊत यांना अंधारात ठेवले की त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावे लागेल. संजय राऊत यांचे असे झाले आहे की, 'तुम करे तो रासलीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला', असे कसे चालेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते. यावर, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी १ कोटी रुपये घेतले, असा आरोप ज्यांनी केला ते भाजपासोबत पैसे मोजायला बसले होते का?, त्यांचे २० टक्के कमिशन होते का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला. याला आता संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. 

चंद्रपूरमध्ये काही कारवाई होणार नाही

सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लम हा झाला की, सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली का नाव घ्यायला? उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचे सर्व कांड घडवून आणले आणि सुपर प्रवक्त्यांना याबाबत कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांचे चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. त्यामुळे अगं अगं म्हशी मला कुठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे त्यांना असे बोलावे लागते. चंद्रपूरमध्ये काही कारवाई होणार नाही. चंद्रपूरचे डील होणार आहे हे संजय राऊतांना माहिती होते. त्यात काही सरप्राइज नाही. आता फक्त ते जे बोलले ते उलट घडत आहे. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असे आहे, असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला. तत्पूर्वी, ज्या दिवशी जनतेला तुम्ही पन्नास खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूरमधल्या एक खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार, असे संदीप देशपांडे यांनी एक्सवर म्हटले.

दरम्यान, संदीप देशपांडे यांना ही माहिती कुणी दिली, ते आम्हाला माहिती नाही. संदीप देशपांडे यांनी त्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे. त्यांनी सांगितले की, कुणी आम्हाला पैसे देऊन विकत घेतले असेल, तर आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो. आम्ही स्थानिक लढाई लढलो. आमच्या इथे जे राजकारण झाले, ते आमचे आम्हाला माहिती आहे. काँग्रेसने वारंवार आमचा अपमान केला. आम्ही अनेकवेळा काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बसून होतो. आम्ही वडेट्टीवारांच्या यांच्या घरी जाऊन बसलो होतो. भाजपाकडून पैसे घेतले असते किंवा घ्यायचे असते, तर आम्ही हे सगळे केले नसते. आम्हाला भाजपाकडून पैसे घ्यायचे असते तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी केली नसती. १ कोटी आले असते तर आलिशान हॉटेलमध्ये बसून चर्चा केली असती. आम्ही जे काही केले ते स्वाभिमानासाठी केले, संदीप देशपांडे स्वतः शिवसैनिक राहिलेले आहे, त्यामुळे त्यांनी असा शिवसैनिकांचा अपमान करू नये, त्यांनी पुरावा द्यावा, आम्ही सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी राजीनामा देतो, असे आव्हान संदीप गिऱ्हे यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: Fissures in Thackeray Brothers' Unity? MNS & Uddhav Sena Clash.

Web Summary : Chandrapur's mayoral election saw BJP win with Uddhav Sena's support, sparking accusations of bribery. Sandeep Deshpande alleged Sena corporators took crores, prompting denials and counter-allegations. Internal conflict and betrayal claims intensify the political drama.
टॅग्स :महापौरचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६शिवसेनासंजय राऊतमनसेसंदीप देशपांडे