चंद्रपूर प्रकरण, उद्धवसेनेचे आव्हान मनसेने स्वीकारले; संदीप देशपांडे म्हणाले, “पुरावे देणार”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:40 IST2026-02-13T11:39:24+5:302026-02-13T11:40:08+5:30
Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने भाजपाला पाठिंबा दिल्यावरून मनसेने सडकून टीका केली आहे.

चंद्रपूर प्रकरण, उद्धवसेनेचे आव्हान मनसेने स्वीकारले; संदीप देशपांडे म्हणाले, “पुरावे देणार”
Chandrapur Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेत २७ नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीने महापौरपदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. भाजपाने थेट उद्धवसेनेच्या पाठिंब्याने पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळविले. भाजपाच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताने काँग्रेसच्या वैशाली महाडुळेंचा पराभव करत महापौरपदी विजय मिळवला. उपमहापौरपदासाठी उद्धवसेनेचे प्रशांत दानव व काँग्रेस समर्थित पप्पू देशमुख यांना समसमान ३२ मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीने दानव यांची निवड झाली. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच उद्धवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी दिलेले आव्हान संदीप देशपांडे यांनी स्वीकारले आहे.
संदीप देशपांडे यांना ही माहिती कुणी दिली, ते आम्हाला माहिती नाही. संदीप देशपांडे यांनी त्या व्यक्तीचे नाव जाहीर करावे. त्यांनी सांगितले की, कुणी आम्हाला पैसे देऊन विकत घेतले असेल, तर आत्ता मी या पदाचा राजीनामा देतो. आम्ही स्थानिक लढाई लढलो. आमच्या इथे जे राजकारण झाले, ते आमचे आम्हाला माहिती आहे. काँग्रेसने वारंवार आमचा अपमान केला. आम्ही अनेकवेळा काँग्रेसच्या ऑफिसमध्ये बसून होतो. आम्ही वडेट्टीवारांच्या यांच्या घरी जाऊन बसलो होतो. भाजपाकडून पैसे घेतले असते किंवा घ्यायचे असते, तर आम्ही हे सगळे केले नसते, असे संदीप गिऱ्हे यांनी सांगितले. यावरून आता संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट करत पुरावे देणार असल्याचे म्हटले आहे.
पुरावा देणार म्हणजे देणार
ज्या दिवशी जनतेला तुम्ही पन्नास खोक्यांचे पुरावे द्याल त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूरमधल्या एक खोक्याचा पुरावा देणार म्हणजे देणार, असे संदीप देशपांडे यांनी एक्सवर म्हटले आहे. तत्पूर्वी, चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे की, उद्धवसेनेच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा मोठा दावाही संदीप देशपांडे यांनी केला. तसेच खासदार संजय राऊत यांना अंधारात ठेवले की त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावे लागेल. संजय राऊत यांचे असे झाले आहे की, 'तुम करे तो रासलीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला', असे कसे चालेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले होते.
दरम्यान, आम्हाला भाजपाकडून पैसे घ्यायचे असते तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी केली नसती. १ कोटी आले असते तर आलिशान हॉटेलमध्ये बसून चर्चा केली असती. आम्ही जे काही केले ते स्वाभिमानासाठी केले, संदीप देशपांडे स्वतः शिवसैनिक राहिलेले आहे, त्यामुळे त्यांनी असा शिवसैनिकांचा अपमान करू नये, त्यांनी पुरावा द्यावा, आम्ही सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी राजीनामा देतो, असे आव्हान संदीप गिऱ्हे यांनी दिले.
ज्या दिवशी जनतेला तुम्ही "पन्नास खोक्यांचे " पुरावे द्याल त्या दिवशी शंभर टक्के चंद्रपूर मधल्या "एक खोक्याचा "पुरावा देणार म्हणजे देणार.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 13, 2026