VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:19 IST2024-12-10T09:13:45+5:302024-12-10T09:19:02+5:30

कुर्ला भीषण बस अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून नागरिक रस्त्यावर धावताना दिसत आहेत.

CCTV footage of the horrific Kurla BEST bus accident viral | VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद

VIDEO: वाऱ्याच्या वेगात बस मार्केटमध्ये घुसली अन्...; कुर्ला बस अपघाताचा थरार CCTV त कैद

Kurla Bus Accident : कुर्ल्याहून अंधेरीकडे जाणाऱ्या बेस्ट बसने कुर्ल्यात अनेक पादचाऱ्यांना आणि वाहनांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री घडला. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून ४९ जण जखमी आहेत. जखमींवर कुर्ला परिसरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर याप्रकरणी ५० वर्षीय बस चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघाताचे अंगावार काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत.  

सोमवारी रात्रीच्या सुमारास कुर्ल्याहून अंधेरीकडे जाणाऱ्या बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बसने पादचाऱ्यांना धडक दिली.  एस. जी. बर्वे मार्गावर हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगातील बसने ३० ते ४० वाहनांना धडक दिल्यानंतर ती एका इमारतीची भिंत तोडून थांबली. बसच्या चालकाच्या म्हणण्यांनुसार बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडला. मात्र वर्दळीच्या ठिकाणी बस इतक्या वेगात का होती असा सवाल आता विचारला जात आहे.

दुसरीकडे, विविध सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस वाऱ्याच्या वेगाने वाहनं आणि पादचाऱ्यांना उडवत जाताना दिसत आहे. बेस्टच्या अनियंत्रित बसने पादचाऱ्यांना धडक दिल्याचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वेगात जाणाऱ्या बसला पाहून नागरिक सैरावैरा पळत होते. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवानसुद्धा जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

"कुर्ल्यामध्ये बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने काही वाहनांना चिरडले. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणामध्ये बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत," अशी माहिती झोन पाचचे उपायुक्त गणेश गावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बस चालकाला ताब्यात घेतले. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगचे जनसंपर्क अधिकारी सुदास सावंत यांनी या घटनेला दुजोरा दिला. "बस नियंत्रण कक्षाकडून अपघाताचा संपूर्ण तपशील संकलित केला जात आहे आणि उपलब्ध झाल्यावर कळवण्यात येईल," असे त्यांनी म्हटले आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही बस १२ मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस होती जी ऑलेक्ट्राने तयार केली होती आणि ती बेस्टने भाडेतत्त्वावर घेतली होती.

Web Title: CCTV footage of the horrific Kurla BEST bus accident viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.