प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:08 IST2024-12-12T09:07:23+5:302024-12-12T09:08:11+5:30
कुर्ला बेस्ट बस अपघाताचे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून बसप्रवासी प्रचंड घाबरलेले दिसत आहेत.

प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे सोमवारी सायंकाळी भरधाव वेगात असलेल्या बेस्ट बसने पादचाऱ्यांना धडक देऊन अनेक वाहनांना धडक दिल्याने सात जण ठार तर अनेक जण जखमी झाले. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासादरम्यान, ड्रायव्हरला योग्य प्रशिक्षण मिळाले नव्हते आणि ब्रेक लावताना त्याने एक्सलेटर दाबल्याचे समोर आले आहे. भरधाव बस वर्दशीच्या ठिकाणी शिरताच वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडत गेली. आता बसच्या आतील सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून अपघातावेळी बसमध्ये काय घडलं हे समोर आलं आहे.
कुर्ला परिसरात ९ डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बस अपघाताच्या जखमा अजून भरलेल्या नाहीत. कुर्ल्यातील बस अपघाताचे हादरवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. व्हिडीओमध्ये कंडक्टर बसमध्ये तिकीट देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बसमध्ये लोकांची गर्दी होती. काही लोक सीटवर बसलेले आहेत तर काही लोक उभे होते. मग अचानक बसचा वेग वाढला आणइ आतील प्रवासी पूर्णपणे घाबरले. इमारतीच्या भिंतीला धडक दिल्यानंतर काही वेळाने बस रिकामी झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
बसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अपघातादरम्यानचा थरार कैद झाला आहे. बस नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी गाडीमध्ये बसलेले आणि उभे असलेल्या प्रवाशांना त्यांच्यासोबत काय होणार याची जराही कल्पना नव्हती. बस सुरु होताच वाहनांना आणि लोकांना धडक देत भिंतीला आदळली. घाबरलेल्या प्रवाशांनी हँडलबारला पकडून ठेवल्याने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. बस थांबताच प्रवाशांनी फुटलेल्या खिडकीमधून उड्या मारून आपला जीव वाचवला.
व्हिडीओमध्ये बसचा चालक संजय मोरे आणि कंडक्टर देखील सर्वात शेवटी बसमधून खाली उतरताना दिसत आहे. अपघात घडल्यानंतर संजय मोरे त्याची बॅग घेऊन खाली उतरला होता.
𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | A shocking CCTV footage from inside the BEST bus involved in the Kurla bus accident has surfaced, showing the chaotic moments before and after the crash. The video captures a normal scene inside the bus, with the conductor issuing tickets to passengers, before the… pic.twitter.com/zMWFzngZj4
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) December 11, 2024
दरम्यान, बस अपघातप्रकरणी बसचालक संजय मोरे याला अटक करण्यात आली. ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा दावा चालक मोरे यांच्या कुटुंबीयांनी केला होता. मात्र बसच्या तपासणीदरम्यान आरटीओच्या टीमला बसचे ब्रेक व्यवस्थित काम करत असल्याचे आढळून आले. चालक संजय मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरे हा कंत्राटी चालक आहे. त्याला इलेक्ट्रिक बस चालविण्याचा फारसा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. मोठी इलेक्ट्रिक बस चालविण्याचे केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १ डिसेंबरपासून त्याला ही बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.