येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 07:22 IST2025-10-31T07:22:36+5:302025-10-31T07:22:46+5:30
बैठकीत काय चर्चा झाली आणि काय घडले, याचे टिपण कपूर काढत असत आणि ते स्वतःलाच मेल करत असत

येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
मुंबई : सीबीआयने गेल्या महिन्यात मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, उद्योगपती अनिल अंबानी आणि इतर ११ जणांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत.
राणा कपूर आणि अंबानी नियमितपणे व्यावसायिक बैठका घेत असत आणि या बैठकांना येस बँकेचा कोणताही अधिकारी उपस्थित राहत नसे. नंतर बैठकीत केलेल्या ठरावांवर प्रक्रिया करण्याचे निर्देश बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले जात, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे.
हे आरोपपत्र २०२२ मध्ये येस बँकेच्या मुख्य अधिकाऱ्याने दाखल केलेल्या दोन गुन्हेगारी तक्रारींशी संबंधित आहे. या आरोपपत्रात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर, त्यांची पत्नी बिंदू कपूर, मुली राधा आणि रोशनी, त्यांच्याशी संबंधित कंपन्या, एडीए ग्रुपचे तत्कालीन अध्यक्ष अनिल अंबानी, रिलायन्स कमर्शिअल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), रिलायन्स होम फायनान्स लि. (आरएचएफएल) आणि इतरांचा समावेश आहे. दरम्यान, प्रकरणी पुढील सुनावणी १४ नोव्हेंबर रोजी आहे.
आरोपपत्रात गुंतवणुकीच्या तपशीलाचाही उल्लेख
सीबीआयच्या मते, येस बँकेने २०१७मध्ये आरसीएफएलच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स आणि व्यावसायिक कर्जामध्ये सुमारे २,०४५ कोटी रुपये, तसेच आरएचएफएलच्या नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स आणि कमर्शियल पेपर्समध्ये २,९६५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्याला राणा कपूरची मंजुरी होती. त्यावेळी केअर रेटिंग्सने एडीए ग्रुपच्या वित्तीय कंपन्यांना 'लक्ष ठेवण्याच्या' यादीत टाकले होते, कारण त्यांची आर्थिक स्थिती खालावत होती, असे आरोपपत्रात नमूद केले आहे. आरोपींनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत.
नेमके काय म्हटले आहे आरोपपत्रात ?
राणा कपूर हे अनिल अंबानी यांच्यासोबत व्यावसायिक बैठका घेत असत. त्या बैठकींना येस बँकेचा कोणताही अधिकारी उपस्थित नसे. चर्चेनंतर कपूर संबंधित प्रस्तावावर एडीए ग्रुपच्या कंपन्यांसाठी प्रक्रिया करण्याचे निर्देश येस बँकेच्या अधिकाऱ्यांना देत, तर अंबानी हे त्यांच्या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना कपूर यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपन्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या अटी सुलभ करण्याचे निर्देश देत.
बैठकीत काय चर्चा झाली आणि काय घडले, याचे टिपण कपूर काढत असत आणि ते स्वतःलाच मेल करत असत. त्या ई-मेलवरून ६ ऑक्टोबर २०१७ रोजी दोघांमध्ये बैठक झाल्याची आणि त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी कपूर यांनी येस बँकेच्या अधिकाऱ्यांना एडीए ग्रुपच्या तीन वित्तीय कंपन्यांच्या एनसीडीमध्ये २,९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल्याची पुष्टी होते.