नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:55 IST2025-06-16T17:53:26+5:302025-06-16T17:55:04+5:30

मुंबई / विटा : नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या दोघा खासगी व्यक्तींना ...

CBI arrests two people from Sangli and Solapur for cheating by promising to increase NEET scores | नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत

नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक; सीबीआयकडून दोघे अटकेत

मुंबई / विटा : नीट परीक्षेतील गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची आणि पालकांची फसवणूक करणाऱ्या दोघा खासगी व्यक्तींना सीबीआयने अटक केली आहे. संदीप शहा (मूळ गाव सोलापूर), सलील खुदबुद्दीन पटेल ( कोतीज, ता. कडेगाव, जि.सांगली, सध्या नवी मुंबई ) अशी आरोपींची नावे असून सूत्रधार फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. त्यांनी बनावट दावे करत एनटीए अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगून गुण वाढविण्यासाठी प्रतिविद्यार्थी ९० लाख रुपये मागितले होते.

दि. ९ जून २०२५ रोजी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपासात आरोपींनी पालकांना मुंबईतील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये भेटून नीटच्या गुणांमध्ये फेरफार करून देण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नव्हे, तर निकाल जाहीर होण्यापूर्वी सहा तासांपूर्वी वाढविलेले गुण कळवण्याचेही आश्वासन दिले होते.

तपासादरम्यान आरोपींच्या मोबाइल फोनमध्ये चॅट्स, उमेदवारांचे रोल नंबर, ॲडमिट कार्ड, ओएमआर शीट्स आणि हवाला मार्गे आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. या आरोपींच्या संपर्कात पुणे आणि नवी मुंबईतील ॲडमिशन कन्सल्टन्सी चालविणारे इतर व्यक्तीही असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सलील पटेल हा नवी मुंबई येथे तर दुसरा आणखी एकजण पुणे येथे ॲडमिशन कन्सल्टन्सी चालवितात.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबईत दि. ९ जून रोजी अटक करण्यात आली, तर सलील पटेलला दि. १० जून रोजी सांगली जिल्ह्यातून कोतीज येथून अटक करण्यात आली आहे. याबाबत विटा पोलिस ठाण्यात नोंद आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली असून, सध्या ती १६ जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

Web Title: CBI arrests two people from Sangli and Solapur for cheating by promising to increase NEET scores