‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 13:40 IST2025-11-02T13:36:59+5:302025-11-02T13:40:22+5:30
MVA MNS Satyacha Morcha: आम्ही अशा केसेसने भीक घालत नाही आणि घाबरत नाही. मूक मोर्चाबाबत भाजपावर गुन्हा दाखल केला का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
MVA MNS Satyacha Morcha: मतदारयादीतील घोळावरून मनसे, महाविकास आघाडीसह विरोधकांनी ‘सत्याचा मोर्चा’ काढला. राज ठाकरे यांचे लोकलने मोर्चाला पोहोचणे, मोर्चाआधी उद्धव ठाकरेंशी त्यांनी केलेली चर्चा, मोर्चातील सहभागाविषयीची शंका दूर करत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेला सहभाग आणि विविध विरोधी पक्षांच्या कार्यकर्ते, समर्थकांचा मोठा उत्साही सहभाग यामुळे मोर्चा लक्षणीय ठरला. परंतु, यानंतर आता ‘सत्याचा मोर्चा’च्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आझाद मैदानासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मतचोरी, दुबार मतदारांची मोठी संख्या या मुद्यांवरून ठाकरे बंधू, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग तसेच केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली. आगामी निवडणुकीत मतचोर दुबार मतदार जिथे दिसेल तिथे त्याला फटकविण्याचे काम करा, असे आवाहन उद्धव आणि राज या दोन ठाकरे बंधुंनी केले. ‘सत्याचा मोर्चा’ला उत्तर म्हणून भाजपाने मूक मोर्चा काढला. ‘सत्याचा मोर्चा’ काढल्यानंतर मुंबई पोलिसांनी आयोजकांवर कारवाईचा बडगा उगारत गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजपवर गुन्हा दाखल केला का?
आम्ही सत्याचा मोर्चा काढून आंदोलन केले, तर आमच्यावर गुन्हा दाखल केला, हे ठीक आहे. परंतु, भाजपा सो कॉल्ड चार ते पाच लोकांना घेऊन मूक मोर्चा काढला, त्या मूक मोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आम्हाला या केसेसमुळे फरक पडत नाही. अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत. आम्ही अशा केसेसने भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ‘सत्याचा मोर्चा’ला परवानगी नव्हती म्हणून गुन्हा, तर मग भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? परवानगी नसेल तर रवींद्र चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही? मूक मोर्चाला परवानगी दिली असेल तर सत्याच्या मोर्चाला परवानगी का दिली नाही? असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात. आधारकार्ड चा डेमो दाखवला म्हणून माझ्यावर गुन्हा, काल सत्याचा मोर्चावर गुन्हा हे सर्व बघता गृहविभाग मंत्रालयातून नाही तर भाजपच्या कार्यालयातून चालतो की काय? या शंकेचे समाधान होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी केली.