नाना पटोलेंना 'लहान' म्हणत संजय राऊतांनीही पवारांची री.. ओढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 07:43 AM2021-07-14T07:43:15+5:302021-07-14T07:46:22+5:30

नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत

Calling Nana Patole 'small', Sanjay Raut also drew sharad Pawar's attention in samna shiv sena mouthpiece | नाना पटोलेंना 'लहान' म्हणत संजय राऊतांनीही पवारांची री.. ओढली

नाना पटोलेंना 'लहान' म्हणत संजय राऊतांनीही पवारांची री.. ओढली

Next
ठळक मुद्देनानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले.

मुंबई - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गेल्या काही दिवसांतील वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ आणि त्यातून महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता, या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. त्यामुळे, शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.  

शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे. नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ! असे शिवसेनेनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे नानांना लहान माणसे संबोधत शरद पवारांची री... ओढण्याचं काम शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आलंय. 

नाना कसे डोलतात यावर सरकारचे भवितव्य नाही

नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालत असल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. 

चंद्रकांत पाटलांना काढला चिमटा

महाराष्ट्रातले सरकार दिल्लीश्वरांच्या डोळय़ांत खुपत आहे. मनात सलते आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राने जी महापूजा मांडली आहे. त्यातला तीर्थप्रसाद म्हणजे नानासारख्यांचे फोन ऐकणे. त्यांच्यावर हेरगिरी करणे. नाना त्यामुळे जास्तच उसळून उठले. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगडय़ा बोलीचे आहे. अर्थात महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार या असल्या हसण्या, बोलण्याने, बागडण्याने ढिले पडणार नाही. ते काल मजबूत होते, आजही आहे आणि उद्यादेखील मजबूत राहील. नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये, असेही अग्रलेखातून सांगण्यात आलंय. 

शरद पवार अन् काँग्रेस नेत्यांची भेट

तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार आहात का? तुमचा निर्णय झाला असेल तर तसे स्पष्ट सांगा, या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपली नाराजी काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त केल्याचे समजते. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पक्ष वाढवण्याच्या भाषेविषयी आपल्या मनात कुठलीही शंका नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो वाढलादेखील पाहिजे. मात्र, ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा शब्दात पवार यांनी स्पष्टपणे स्वतःचे मत सांगितल्याचे वृत्त आहे.
 

Web Title: Calling Nana Patole 'small', Sanjay Raut also drew sharad Pawar's attention in samna shiv sena mouthpiece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.