तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:53 AM2024-02-20T09:53:19+5:302024-02-20T09:55:12+5:30

मुख्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविणार. 

by spending 30 crores will prevent the flood of mithi river and the water of vihar lake will be diverted elsewhere | तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार

तब्बल ३० कोटी खर्च करून ‘मिठी’चा पूर रोखणार; ‘विहार’चे पाणी इतरत्र वळविणार

मुंबई : मुसळधार पावसामुळे दरवर्षी मिठी नदीला पूर येतो. या पुराचे पाणी आजूबाजूच्या रहिवासी भागांमध्ये शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही गोष्ट लक्षात घेत पूरमुक्तीसाठी विहार तलावातील ओसंडून वाहणारे पाणी भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये वळविण्यात येणार आहे. यामुळे पूरपरिस्थिती टाळणे शक्य होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला. मात्र, यासाठी महापालिका ३० कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुसळधार पावसात समुद्राला भरती असल्यास मुंबईत अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. मिठी नदीच्या पात्रात ओसंडून वाहणाऱ्या विहार तलावातील पाण्याची आणखी भर पडते. मिठी नदीला आलेल्या पुरामुळे परिसरामध्ये पाणी घुसते. या तिन्ही घटना एकत्रित घडल्यास मिठी नदीलगतच्या संपूर्ण परिसराला फटका बसतो. स्थानिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. विहार तलावातून ओसंडून वाहणारे पाणी भांडुप जलशुद्धीकरण प्रकल्पात वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींतून मार्ग काढण्यात येणार आहे, त्याचबरोबर  मिठीतील अतिरिक्त पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत. याशिवाय उदंचन केंद्रही उभारावे लागणार आहे. त्यानुसार, मुंबईत महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या कामासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात एकूण २० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. यासह पुराच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आणखी काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

रहिवाशांना दिलासा :

पुरामुळे परिसरामध्ये पाणी घुसते. त्याचा फटका सिप्झ, मरोळ, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल यांसह कुर्ला परिसरातील बैलबाजार, क्रांतीनगरला बसतो. पावसाळ्याच्या तोंडावर या परिसरात एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज ठेवाव्या लागतात. खबरदारी म्हणून या परिसरातील लोकांचे स्थलांतरही करावे लागते. अशात विहार तलावातील पाणी वळविण्याचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मोऱ्यांची पुनर्बांधणी :

महापालिकेच्या ए विभागातील पिसे पांजरापूर संकुल येथील महापालिकेच्या हद्दीतील मुख्य जलवाहिन्यांच्या सेवा रस्त्यालगत अस्तित्वात असलेले जुने दगडी पूल आणि मोऱ्यांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया यापूर्वी सुरू करण्यात आली होती. प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.

Read in English

Web Title: by spending 30 crores will prevent the flood of mithi river and the water of vihar lake will be diverted elsewhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.