“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 06:10 IST2025-03-03T06:07:54+5:302025-03-03T06:10:16+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सरकार वाचवत नाही. कुणीही त्यांच्याबद्दल बोलले तर कारवाई होणारच, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

burden of various schemes financial discipline is necessary but ladki bahin yojana will not be stop said cm devendra fadnavis | “विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

“विविध योजनांचा भार, आर्थिक शिस्त गरजेची, त्यामुळे ‘लाडकी बहीण’...”: CM फडणवीस थेट बोलले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : हायसिक्युरिटी नंबर प्लेटच्या दराबाबत चुकीची माहिती पसरवली गेली. इतर राज्यांनी जीएसटी आणि प्लेट बसवण्याचा आकार वगळून दर ठरवले आहेत, तर आपण दर ठरवताना जीएसटी आणि प्लेट बसवण्याचे आकार त्यात समाविष्ट केले. हे जर आपण बघितले तर इतर राज्यांचे आणि आपले दर समान आहेत, उलट काही राज्यांपेक्षा आपल्याकडे ५ टक्के कमीच दर आहे, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला.  

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या कुणालाही सरकार वाचवत नाही. कुणीही त्यांच्याबद्दल बोलले तर कारवाई होणारच, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

लाडकी बहीण, महत्त्वाच्या योजना बंद करणार नाही 

अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प अतिशय चांगला आणि समतोल असेल. वेगवेगळ्या योजनांचा भार अर्थसंकल्पावर असला तरी आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही लाडकी बहीणसह कोणत्याही महत्त्वाच्या योजना बंद करणार नाही. नियमाच्या बाहेर आहेत त्यांनाच आम्ही वगळणार आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘आमची रोटेटिंग चेअर’

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार नवीन आले असले तरी टीम जुनीच आहे. आता आपल्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे बघत म्हणताना अजितदादांची खुर्ची फिक्स आहे, असे शिंदे म्हणाले. त्यावर तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू? असा टोला अजित पवारांनी लगावला. तर आमची रोटेटिंग चेअर आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महिला सक्षमीकरण, संविधानावर विशेष चर्चा

८ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने आणि महिला दिन असल्याने सक्षमीकरणाबाबत चर्चा आणि संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने दोन दिवसांची संविधानाच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.

उत्तर देण्याची तयारी : पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यावेळी विरोधी पक्षांनी सरकारला जे पत्र लिहिले आहे, हे आतापर्यंत विरोधी पक्षांनी दिलेले सगळ्यात मोठे पत्र आहे. आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे. बहुमताच्या जोरावर कामकाज आम्ही रेटणार नाही.

 

Web Title: burden of various schemes financial discipline is necessary but ladki bahin yojana will not be stop said cm devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.