Breaking: भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळेंचं कोरोनाच्या आजाराने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:33 IST2020-06-16T14:11:01+5:302020-06-16T14:33:16+5:30
जळगाव जिल्ह्यातील यावल आणि रावेल मतदारसंघातून आमदार व खासदार बनून हरिभाऊ जावळे यांनी लोकप्रतिनिधित्व केले आहे.

Breaking: भाजपा जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळेंचं कोरोनाच्या आजाराने निधन
जळगाव : भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनाच्या आजारात निधन झाले, ते ७१ वर्षांचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. त्यानंतर, त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून आमदार व खासदार बनून हरिभाऊ जावळे यांनी लोकप्रतिनिधित्व केले आहे. मतदारसंघातील आपल्या मूळ भालोद या गावी काम करत असतानाचा हरिभाऊंना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, गेल्या १० दिवसांपूर्वीच त्यांना गावाकडून मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोरोनाशी लढताना त्यांची प्राणज्योत मालवली. जावळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली असून भाजपा कार्यकर्त्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे हे भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.