BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:41 IST2025-12-17T13:39:25+5:302025-12-17T13:41:10+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने शिंदेंच्या शिवसेनेला जवळ केले आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र दूर ढकललं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने आता स्वबळाची तयारी सुरू केली आहे.

BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे. तर अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. पहिली बैठक पार पडली असून, राष्ट्रवादीने ५० जागा लढवण्याचा तयारी केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीची मंगळवारी बैठक झाली झाली. याच बैठकीत मुंबईतील ताकदीचा आढावा घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असल्याचे कारण देत भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील २२७ प्रभागांचे सर्वेक्षण केले आहे. त्याचा अहवाल तयार करण्यात आला असून, बैठकीत त्यातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली .
आता पुढे काय?
पक्षाच्या आमदार सना मलिक यांनी सांगितले की, "२२७ प्रभागांच्या सर्वेक्षणाचा अहवाल पक्षाच्या अध्यक्षांना देणार आहोत. महायुतीतील घटक पक्षांपैकी कुणीही संपर्क केलेला नाही. आम्हाला मीडियाच्या माध्यमातूनच कळले आहे. आम्ही जो अहवाल तयार केला आहे, तो अजित पवारांना देणार आणि त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष जो आदेश देतील, तसे केले जाईल."
"समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेचे मुद्दे हे नवाब मलिक अजित पवारांकडे मांडतील. पक्षाने आदेश दिल्यानंतरच आम्ही २२७ जागांवर निवडणूक लढवण्याबद्दल पुढे जाऊ. स्वबळ आणि महायुतीत अशी दोन्ही पर्यायांमध्ये आमची लढण्याची तयारी आहे", असे सना मलिक म्हणाल्या.