EXCLUSIVE: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 17:46 IST2026-01-08T17:45:05+5:302026-01-08T17:46:27+5:30
CM Devendra Fadnavis Lokmat Interview: लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली.

EXCLUSIVE: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
महापालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी आणि विरोधक कंबर कसून तयारीला लागले आहेत. यात मुंबई महापालिकेची निवडणूक ही प्रचंड प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच ठाकरे बंधू एकत्र आलेत. उद्धव ठाकरे यांची उद्धवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोन पक्षांच्या युतीने या निवडणुकीत प्रतिस्पर्धी भाजपा-शिंदेसेनेच्या महायुतीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. याच दरम्यान लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली.
ठाकरेंच्या युतीमुळे भाजपाने कमी जागा घेतल्या का?, तडजोड केली का? यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करत जागावाटपाची इनसाईड स्टोरी सांगितली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी स्क्रिप्ट बदलावी. नवीन रायटर घ्या, संजय राऊतांच्या स्क्रिप्ट वाचूनच तुमची ही अवस्था झाली आहे असं म्हणत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मराठी माणसांसाठी काय केलंत? असा सवालही विचारला आहे.
"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्रित आल्यामुळे भाजपाला त्याचा कोणताही फटका नाही, कोणताही परिणाम नाही, याचं कारण भारतीय जनता पक्षाचे स्टेबल व्होट आहेत. मराठी माणसांमध्ये भाजपाचा जो टक्का आहे, तो कोणी सोबत आलं, कोणी काही केलं तरी अर्धा टक्काही कमी होत नाही. प्रत्येक निवडणुकीत एक नंबरचा पक्ष भाजपा आहे."
"युतीचं राजकारण करताना काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागल्या"
"आम्हाला चिंता एवढीच होती की, हे एकत्र आल्यामुळे शिंदेसाहेबांकडे जो मराठी व्होटर गेलाय त्याच्यावर काही परिणाम होतो का? पण आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्यावरही काही परिणाम होणार नाही. आम्ही आपापसात नीट व्होट ट्रान्सफर करतोय. त्यामुळे आम्हाला त्याची काहीच चिंता नाही. आम्ही १६० म्हणत होतो पण आमची अपेक्षा १४५ ते १५० मध्ये होती. पण युतीचं राजकारण करताना काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागल्या, आम्हाला १३७ मिळाल्या, त्यांना ९० मिळाल्या" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
"मोर्चे काढण्याव्यतिरिक्त काय केलं?"
"मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल हे बाळबोध आणि वेड्यासारखं वाक्य आहे. किती निवडणूका तेच तेच बोलणार आहे? उद्धव ठाकरे यांनी स्क्रिप्ट बदलावी. नवीन रायटर घ्या, संजय राऊतांच्या स्क्रिप्ट वाचूनच तुमची ही अवस्था झाली आहे. आता नवीन रायटर आणा, काहीतरी फ्रेश बोला. विकासावर बोला. मोर्चे काढण्याव्यतिरिक्त काय केलं? मराठी माणसांसाठी काय केलंत? गिरणी कामगारांना घरं देऊ शकलात? आम्ही दिली, पुढेही देणार आहोत. वडापावच्या गाड्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही दिलं नाही."
"मराठी माणूस दक्षिण मुंबईतून हद्दपार झाला, का झाला? २५ वर्षे तुमची सत्ता होती मग का बीडीडी चाळीचा विकास केला नाही, कारण तुम्हाला बिल्डर हवा होता. मी सांगितलं बिल्डर येणार नाही. निर्णय घेतला. यांच्या लोकांनी आंदोलनं केली. त्यांना अर्धवट आठवतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याचा निर्णय झाला, आराखडे झाले, त्याचं टेंडर निघालं. काम सुरू झालं. नंतर तुमचं सरकार आलं आणि भूमिपूजन झालं."
"मराठी माणसाला आम्ही घर दिलं"
"हे २०१८ मध्ये झालं, १९ ला काम सुरू केलं. यांच्याकडे सांगायला काहीच नाही. पत्राचाळ शिवसेनेकडे होती. तुमचे लोके बिल्डर होते, तुम्ही स्वत: भ्रष्टाचार केला आणि मराठी माणसाला रस्त्यावर आणलं. भाजपाची सत्ता आल्यावर पत्रा चाळवाल्यांना घर दिलं. मराठी माणसाला आम्ही घर दिलं. हे विकासावर बोलू शकत नाहीत. मराठी माणसांचं अस्तित्व हे एकदम कायम आहे. मराठी माणसासाठी तुम्ही काही केलं नाही. मराठी माणूस तुमच्यासोबत येणार नाही" असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.