Join us
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 13:21 IST

महायुतीत काही नरमाईची भूमिका घेत शिंदेसेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय शिंदेसेनेवर उघडपणे टीका करू नका अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत. 

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी आता ४ दिवस शिल्लक आहेत परंतु जागावाटपावरून प्रत्येक राजकीय सस्पेन्स कायम ठेवला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी युती आणि आघाडीच्या पक्षांनी ही रणनीती अवलंबली आहे. मुंबईत ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा झाली आहे परंतु जागांचा आकडा अजून जाहीर करण्यात आला नाही. त्यात भाजपा आणि शिंदेसेना हेदेखील महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. या दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती आहे. 

मुंबईत भाजपा १४० तर शिंदेसेना ८७ जागांवर लढणार असल्याचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने पुढे येत आहे. येत्या १५ जानेवारीला मुंबईत मतदान होणार आहे. त्यात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या दोन्ही पक्षात २०० जागांपर्यंत एकमत झालं असून अद्याप २७ जागांवर चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे महायुतीसमोर आव्हान उभे राहिले आहे. त्यात कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा महापौर मुंबईत बसवायचा असा प्रयत्न भाजपा नेतृत्वाचा आहे. त्यामुळे महायुतीत काही नरमाईची भूमिका घेत शिंदेसेनेला जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय शिंदेसेनेवर उघडपणे टीका करू नका अशा सूचनाही भाजपा नेत्यांना देण्यात आल्या आहेत. 

महायुतीच्या घोषणेबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आमची महायुती आधीच आहे त्यामुळे आम्हाला घोषणेची गरज नाही असं म्हटलं आहे. भाजपा आणि शिंदेसेना एकत्र आहोत. सर्वकाही सुरळीत सुरू आहे. आम्हाला युतीच्या घोषणेची गरज नाही. असं त्यांनी सांगितले होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. २८८ पैकी ११७ नगरपालिकांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले. त्यानंतर ५३ नगरपालिकांमध्ये शिंदेसेनेने बाजी मारली. त्यामुळे आता राज्यातील २९ महापालिकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार

दरम्यान, मुंबई महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे. याठिकाणी नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीशी युती करण्यास भाजपा आणि शिंदेसेनेने नकार दिला होता. मात्र अजित पवारांनी मलिकांच्या मागे ठाम असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे मुंबईत महायुतीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्रित निवडणूक लढवणार आहे तर अजित पवारांचा पक्ष वेगळे लढणार आहे. या निवडणुकीत भाजपा १४० तर शिंदेसेनेला ८७ जागा लढवणार आहे. त्यात महायुतीतील छोट्या घटक पक्षांना भाजपाच्या कोट्यातून जागा मिळेल अशी शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance formula finalized; Mumbai seat-sharing resolved: BJP, Shinde Sena to contest?

Web Summary : The BJP and Shinde Sena have finalized their seat-sharing formula for the Mumbai municipal elections. BJP will contest 140 seats, while Shinde Sena will contest 87. Ajit Pawar's NCP will fight independently after alliance refusal. Discussions continue for remaining seats.
टॅग्स :महानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६भाजपाएकनाथ शिंदेअजित पवारमहायुती