Join us
Daily Top 2Weekly Top 5

“ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड”; बॅनर दिसताच CM फडणवीसांच्या कृतीचे होतेय कौतुक, नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 19:30 IST

CM Devendra Fadnavis BMC Election Result 2026 News: ‘ठाकरे ब्रँडचा वाजयाल बँड’ असा बॅनर समोर आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली कृतीवर चर्चा सुरू झाली आहे.

CM Devendra Fadnavis BMC Election Result 2026 News: जे जनमत आले आहे, त्यावरून सांगतो की, लोकांना विकास हवा आहे. लोकांना प्रामाणिक कारभार हवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींनाही वंदन करतो. कारण त्यांचेही आशीर्वाद आपल्याला लाभले आहेत. ज्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढलो, त्या विकासाच्या अजेंड्याला लोकांनी प्रतिसाद दिला. आमचा अजेंडा विकासच असणार आहे. लोकांच्या आयुष्यात परिवर्तन आणण्यासाठी आम्ही वाटचाल करणार आहोत, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिला.

मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live.

मुंबई मनपा निवडणुकीचे निकाल येत आहेत. भाजपा ९० ठिकाणी आघाडीवर असून, अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत. तर शिंदेसेना २८ जागांवर आघाडीवर असून, अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत. तर उद्धवसेना ५७ आणि मनसे ९ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे एमआयएम पक्षाने मुंबईत चार जागांवर विजय मिळावला आहे. यातच विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी मुंबई येथील भाजपा कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्यासह भाजपाचे मुंबईतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध बॅनर हाती घेतले होते. यातच ‘ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड’, अशा आशयाचाही बॅनर होता. परंतु, हा बॅनर समोर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कृती ही कौतुकाचा विषय ठरत आहे.  

ठाकरेंचा बॅनर दिसताच CM फडणवीसांची नेमके काय केले?

मुंबईतील भाजपाच्या मुख्य कार्यालयात विजयी आघाडी घेतल्यावर मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री आणि अन्य नेते मंचावर उभे असताना ‘ठाकरे ब्रँडचा वाजलाय बँड’ असा बॅनर देवेंद्र फडणवीसांसमोर आला. यावेळी खुणेनेच तो बॅनर दूर करण्याची सूचना देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यामुळे ठाकरे बंधूंबाबत देवेंद्र फडणवीस यांना असलेला आदर पुन्हा दिसला. ठाकरे विरोधक असले तरी शत्रूत्व नाही, हेही देवेंद्र फडणवीसांच्या कृतीवरून पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीसांच्या या कृतीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. अलीकडेच लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले होते की, ठाकरे बंधू कालबाह्य होतील, असे अजिबात म्हणणार नाही. तशी अपेक्षाही कोणी करू नये. राजकारणात वेगवेगळी परिस्थिती येत असते. 

दरम्यान, आमच्या विचारांच्या आत्मा हिंदुत्ववाद आहे. आम्हाला हिंदुत्ववादी असल्याचा अभिमान आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाहीत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत. त्यामुळेच व्यापक जनसमर्थन आपल्याला मिळाले आहे. कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की, जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. जिंकल्यानंतर कुठलाही उन्माद नको, अशा स्पष्ट सूचना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयात उपस्थितांना संबोधित करताना दिल्या.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis halts 'Thackeray Brand Fails' banner, act praised post-election.

Web Summary : After BJP's BMC success, CM Fadnavis stopped a disparaging banner about the Thackerays. He emphasized development, Modi's influence, and respect for Balasaheb Thackeray. Fadnavis urged party workers to avoid arrogance, promoting inclusive Hindutva.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकामुंबई महानगरपालिकादेवेंद्र फडणवीसभाजपामहायुतीउद्धव ठाकरेराज ठाकरे