Join us
Daily Top 2Weekly Top 5

“आधीपासूनच सांगतोय, मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच दिवशी…”; भाजपा नेत्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:32 IST

BMC Mumbai Municipal Election Result 2026: मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही फायदा झालेला पाहायला मिळालेला नाही. भाजपाने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे.

BMC Election Result 2026: मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही फायदा झालेला पाहायला मिळालेला नाही. भाजपा ९० ठिकाणी आघाडीवर असून, अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत. तर शिंदेसेना २८ जागांवर आघाडीवर असून, अनेक ठिकाणी उमेदवार विजयी झालेले आहेत. तर उद्धवसेना ५७ आणि मनसे ९ जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे एमआयएम पक्षाने मुंबईत चार जागांवर विजय मिळावला आहे. यानंतर आता नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाच्या एका नेत्याने ठाकरे बंधूंबाबत मोठे विधान केले आहे. मुंबई महानगरपालिका निकालाचे सर्व अपडेट्स इथे पहा Live.

ज्या दिवशी ठाकरे बंधू एकत्र आले, त्यावेळी त्यांच्या एकत्र येण्याचा काही फायदा होणार नाही, हे आधीपासूनच सांगत होतो. उद्धवसेनेला ४५, राज ठाकरेंच्या मनसेला २०, भाजपाला ९०, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४० हे मी सांगत होतो. मी काही भविष्यकार नाही. ४७ वर्ष विद्यार्थी चळवळ, राजकीय चळवळीत काम केल्याने मी हे अनुमान लावले होते, असे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

 भाजपाला नामोहरम करण्याचे प्रयत्न व्हायचे

२०१४ ला नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून उदय होण्याआधी भाजपाला नामोहरम करण्याचे प्रयत्न व्हायचे. त्या प्रयत्नांना यशही मिळायचे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून ते प्रयत्न केले जायचे. पण २०१४ नंतर मोदींवर होणारे आरोप हे राजकीय आरोप असल्याचे लोकांना समजले. लोकांचा मोदींवर विश्वास बसला. मुंबई गुजरातला जोडणार, मराठी महापौर करणार नाही, मराठी माणसाला न्याय मिळणार नाही या सगळ्या आरोपांवर लोकांना आता विश्वास राहिलेला नाही. मोदींचा कारभार पारदर्शी आहे याची जाणीव लोकांना आता झाली आहे, असेही पाटील म्हणाले. 

दरम्यान, मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांमधील भाजपचा विजय हा विकास आणि महायुतीवरील जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. हा कौल म्हणजे केवळ निवडणुकीचा निकाल नसून, तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या नेतृत्वावर व्यक्त झालेला ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातील एकूण नगरसेवकांपैकी सुमारे ५१ टक्के नगरसेवक भाजप व महायुतीचे असतील आणि भाजपला दोन-तृतीयांशपेक्षा अधिक बहुमत मिळेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Thackeray brothers' alliance in Mumbai ineffective, BJP leader declared beforehand.

Web Summary : BJP leader Chandrakant Patil stated that the alliance of Thackeray brothers in Mumbai proved ineffective, as predicted. He highlighted public trust in Modi's transparent governance and BJP's expected victory in upcoming elections due to faith in development.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६नगर पालिकाभाजपाचंद्रकांत पाटीलशिवसेनामनसेराज ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६