मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:50 IST2026-01-06T15:48:17+5:302026-01-06T15:50:07+5:30
मुंबई वाचवायची आहे असं सांगत उद्धवसेना-मनसे युती निवडणूक लढवत आहे. मात्र या दोन्ही पक्षाला बंडखोरी आणि नाराजीचा फटका बसत आहे

मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम
मुंबई - ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मुंबईत भगदाड पडलं आहे. मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी पक्षाची साथ सोडत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर आता मनसेच्या प्रवक्ते, सरचिटणीसांसह अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. भाजपापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनसेला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेला तगडा झटका बसला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी आज शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच ठाकरे बंधू युतीने निवडणुकीला सामोरे जात आहेत.
📍 ठाणे |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 6, 2026
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजाभाऊ चौगुले, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, मनसे चित्रपट सेनेचे सरचिटणीस राहुल तूपलोंढे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदेश शेट्टी, मुनव्वर शेख, जनहित कक्षाचे ऍड.देवाशीष मर्क, प्रथमेश बांदेकर, संतोष यादव यांनी #शिवसेना… pic.twitter.com/KjitT5SZOC
मुंबई वाचवायची आहे असं सांगत उद्धवसेना-मनसे युती निवडणूक लढवत आहे. मात्र या दोन्ही पक्षाला बंडखोरी आणि नाराजीचा फटका बसत आहे. माजी नगरसेवक संतोष धुरी हे वार्ड क्रमांक १९४ मधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्याठिकाणी उद्धवसेनेचे निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे संतोष धुरी नाराज होते. त्यात मंत्री नितेश राणे यांच्या माध्यामतून संतोष धुरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आज मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केला.
राजाभाऊ चौगुले हे मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत होते. ते वार्ड क्रमांक १४९ मधून माजी नगरसेवक होते. त्याशिवाय पक्षाचे सरचिटणीस पद त्यांच्याकडे होते. पक्षाच्या कठीण काळातही त्यांनी मनसेची साथ सोडली नाही. पक्षाचे प्रवक्ते हेमंत कांबळे हेदेखील हिरारिने मनसेची बाजू प्रसारमाध्यमात मांडत होते. मात्र आज त्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले त्यामुळे दोन्ही पक्षातील बरेच जण नाराज झाले. मागील ८ वर्षापासून महापालिका निवडणुका लागल्या नव्हत्या. त्यात अनेक इच्छुक निवडणूक लढण्याची तयारी करत होते. परंतु युतीमुळे दोन्ही पक्षातील नाराजी उफाळून आली. त्याचा फटका आता मनसेला बसला आहे.