मुंबई- राज्यातील महापालिका निवडणुकीत ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचे ६० हून अधिक बिनविरोध उमेदवार नगरसेवक बनले आहेत. या बिनविरोधमध्ये सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे आहेत. ज्याठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तिथे सत्ताधारी महायुतीने पैशांचे आमिष, दमदाटी आणि दहशत निर्माण केली असा आरोप विरोधकांनी केला. त्यातच आता मुंबईतील वार्ड क्रमांक २२६ मध्येही बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी भाजपाने अपक्ष उमेदवाराला दमदाटी केल्याचा आरोप आहे.
मुंबईतील वार्ड क्रमांक २२६ मध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात केवळ एकच अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी अर्ज भरला आहे. या वार्डात या दोन्ही उमेदवारांमध्येच थेट लढत होणार आहे. त्यातच तेजल पवार यांनी नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. तेजल पवार म्हणाल्या की, ३० डिसेंबर आम्ही अर्ज भरला, त्यानंतर ३१ तारखेला छाननी प्रक्रियेत माझा अर्ज वैध ठरला. त्यानंतर भायखळा येथे मकरंद नार्वेकरांच्या कार्यकर्त्यांनी माझ्या पतीला एका कारमधून घेऊन गेले. त्या कारमध्ये मकरंद नार्वेकर, राहुल नार्वेकर हे होते. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला दुसऱ्या कारमध्ये बसवले. माझ्या बाजूला दुसरे अपक्ष होते, त्यांचा अर्जही वैध ठरला होता. त्या कारने आम्हाला राहुल नार्वेकरांच्या कफपरेड येथील बंगल्यावर नेले. तिथे मी माझे पती इथे आहेत, मला घरी जायचे आहे माझी लहान मुले आहेत असं सांगून तिथून निघाले. माझ्या पतीला त्यांनी पैशांची ऑफर दिली. मात्र पतीने हा माझ्या पत्नीचा निर्णय आहे असं त्यांना सांगितले. त्यानंतर मला मकरंद नार्वेकरांचा फोन आला, त्यांनी मला बोलावले. मात्र मी येणार नाही तुम्ही माझ्या पतीला पाठवा, मी त्यांच्याशी बोलून तुम्हाला निर्णय कळवते असं सांगितले.
त्यानंतर अर्ध्या तासाने नार्वेकरांच्या पीएला आमच्या घरी पाठवले. ते मला अर्ज मागे घेण्यासाठी समजावत होते. बोलता बोलता त्यांनी मला राजू नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत त्यांना आम्ही तडीपार केले. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले हे सर्व सांगितले. त्यावर तुम्ही मला धमकावत आहात का असं विचारले. ऑफिसमध्ये जेवढे पैसे ऑफर केले त्यापेक्षा अधिक पैसे घ्या. १० लाख रूपये देतो अर्ज मागे घ्या असं सांगितले. पण मला पैसे नको, मला निवडणुकीत उभे राहायचे आहे असं सांगितले. परंतु ते घरातून जायला तयार नव्हते. माझे पती त्यांना घेऊन खाली गेले. पुन्हा ४ च्या सुमारास माझ्या घरच्या दरवाजाची बेल वाजवली. मात्र आम्ही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर काही वेळाने मी माझ्या मुलांना सोबत घेऊन तिथून निघून गेले. माझे पतीही बाहेर पडले. २ तारखेपर्यंत मी आणि माझे पती बाहेरच होतो. पती एकीकडे आणि मुलांसोबत मी दुसरीकडे होते असा प्रसंग अपक्ष उमेदवार तेजल पवार यांनी सांगितला.
दरम्यान, आम्ही फोन स्वीच ऑफ केला. नातेवाईकांमार्फत ते आमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. २ तारखेला आमच्यावर खूप दडपण आले होते. त्यांच्याकडे पैशांची पॉवर आहे. काहीही करू शकतात असं तेजल पवार यांनी म्हटलं. तर मला भायखळा येथून बंगल्यावर नेले तेव्हा माझ्यासमोर रोकड ठेवण्यात आली. त्याशिवाय बीएमसीचे कंत्राट होते. कुठला व्यवसाय करायचा आहे तिथे सेटल करून देतो. काही काळजी करू नको असं मला ऑफर केली. मी पैशांना हात लावला नाही असं तेजल पवार यांचे पती दीपक पवार यांनी म्हटलं. आता या वार्डात उद्धवसेना-मनसे आणि काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार तेजल पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे या वार्डातील लढत भाजपा विरुद्ध अपक्ष उमेदवार अशी होणार आहे.
Web Summary : Tejal Pawar alleges Rahul Narvekar pressured her to withdraw from elections for his brother. Bribes and threats were allegedly used. Uddhav Sena supports Pawar.
Web Summary : तेजल पवार का आरोप है कि राहुल नार्वेकर ने अपने भाई के लिए चुनाव से हटने का दबाव डाला। रिश्वत और धमकियों का इस्तेमाल किया गया। उद्धव सेना ने पवार का समर्थन किया।