मराठी मुंबईकरांची मने कोण जिंकणार? ठाकरे बंधूंची युती की महायुती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:43 IST2026-01-05T10:42:09+5:302026-01-05T10:43:20+5:30
गेली तीन दशके मराठी मतदार पालिका निवडणुकीत निर्णायक घटक राहिला. यावेळी केवळ भावनेवर नाही तर अनुभवावर मतदान करेल, असे दिसते.

मराठी मुंबईकरांची मने कोण जिंकणार? ठाकरे बंधूंची युती की महायुती?
मुंबई, महेश पवार, प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीकडे केवळ प्रभागांची लढाई नव्हे तर मुंबईच्या ओळखीची व पुढील भवितव्याची चाचपणी म्हणून पाहायला हवे. २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीची मुदत २०२२ मध्ये संपली. तेव्हा उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे पुढे ढकललेल्या पालिका निवडणूक आता तीन वर्षांनंतर होताहेत. या तीन वर्षांत एकाचे दोन पक्ष झाले. कधी काळी गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे आता पक्के राजकीय वैरी झालेत.
मराठी मतदाराने पालिकेची सत्ता नेहमीच शिवसेनेच्या हाती दिली. लोकसभा, विधानसभेला मुंबईतील मुस्लीम मते उद्धवसेनेच्या बाजूने झुकली होती. आता परिस्थिती वेगळी आहे. सत्ताधारी भाजप, शिंदेसेनेची महायुती विरुद्ध उद्धवसेना आणि मनसे या प्रमुख लढतीत काँग्रेसनेही वंचित बहुजन आघाडीसह उडी घेतल्याने तिरंगी लढतीचे चित्र आहे.
उद्धवसेनेकडे वळणारी मराठी मते महायुतीकडे वळविण्यासाठी मुंबईचा महापौर खान होऊ देणार नाही, असा भाजपचा जोरकस प्रचार सुरू आहे. तर, ठाकरे बंधूंनी मराठी माणूस आणि मुंबईसाठी जुने राजकीय वैर दूर करून एकमेकांना जवळ केले आहे. महापौर मराठीच असेल, यावर ठाम राहात त्यांनी मुंबईची लूट, बिल्डर-राजकारणी साटेलोटे, स्थानिकांना डावलण्याचा आरोप या भावनिक मुद्द्यांवरून मराठी अस्मितेलाच साद घातली आहे.
गेली तीन दशके मराठी मतदार पालिका निवडणुकीत निर्णायक घटक राहिला. यावेळी केवळ भावनेवर नाही तर अनुभवावर मतदान करेल, असे दिसते. फूटपाथवरील अतिक्रमण, रस्ते, पाणी, कचरा, वाहतूक, पुनर्विकास हे प्रश्न मतदाराच्या पाचवीलाच पूजलेले आहेत. सत्ता असूनही माझ्या वॉर्डात काय बदल झाला? हा त्याचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नावर निवडणूक फिरू शकते. मराठी मुंबईकर नावावर नाही तर कामावर मत देणार आहे. अस्मिता महत्त्वाचीच पण ती अन्न, चांगले रस्ते आणि सुरक्षित भवितव्य देऊ शकते का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
पालिकेच्या २२७ प्रभागांपैकी १३८ प्रभागांत मराठी, तर ४७ प्रभागांत मुस्लीम मतदारांचे प्राबल्य आहे. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना व मनसे या प्रमुख पक्षांत मराठी मतदार विभागलेला आहे. तो आपल्याकडे अधिक वळावा, यासाठी उद्धवसेनेने १४६, भाजपने ९२, शिंदेसेनेने ७३, मनसेने ४९, काँग्रेसने ६३ मराठी उमेदवार दिले आहेत. आजच्या राजकारणात मराठी मतदार संभ्रमात असला तरी तो दिशाहीन झालेला नाही. काही मराठीबहुल वॉर्डांत चुरशीची लढत होऊ शकते; पण मराठी मुंबईकरांची मने नेमकी कोण जिंकणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
मराठीबहुल प्रभागात अशा होतील लढती
मराठीबहुल १३७ प्रभागांत शिंदेसेना-भाजप विरोधात उद्धवसेना-मनसे-राष्ट्रवादी (शरद पवार) असा सामना रंगणार आहे. उद्धवसेना भाजपला ५७, तर शिंदेसेनेला ४६ प्रभागांत थेट लढत देणार आहे. तर, मनसे १० प्रभागात शिंदेसेना आणि २० प्रभागांत भाजपविरोधात उभी ठाकली आहे. भाजप, शिंदेसेनेची प्रत्येकी २ प्रभागांत राष्ट्रवादी (शरद पवार)शी लढत होईल. उद्धवसेनेने ११ आणि शिंदेसेनेने १० प्रभागांत मुस्लीम उमेदवार दिले आहेत. मात्र, ४७ प्रभागांत वर्चस्व असणारी मुस्लीम मते यावेळी उद्धवसेनेला मिळणार की पारंपरिक काँग्रेसला, याची उत्सुकता आहेच.