“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 14:51 IST2026-01-11T14:51:49+5:302026-01-11T14:51:56+5:30
CM Devendra Fadnavis PC News: हिंदुत्वावर का बोलायचे नाही. आम्हाला हिंदुत्वावर अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
CM Devendra Fadnavis PC News: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू आहे. पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. यातून अनेक आश्वासने दिली जात आहे. मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपा-शिंदेसेनेच्या महायुतीने आपला वचननामा जाहीर केला. लाडक्या बहिणींसाठीही या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
हिंदू-मुसलमान किंवा भारत-पाकिस्तान या विषयांचा आधार न घेता भाजपाने एखादी निवडणूक लढवून दाखवावी, मी १ लाख रुपये देईन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारत आहात. तुम्ही उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारायला हवा. मी खुले आव्हान दिले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा मुद्दा दाखवा आणि ५ हजार रुपये मिळवा. आमची भाषणे तुम्ही काढून बघितली, तर त्यांच्या आरोपाला, टीकेला आम्ही नक्कीच उत्तरे देतो. हिंदुत्वावर का बोलायचे नाही. आम्हाला हिंदुत्वावर अभिमान आहे. परंतु, आमच्या भाषणात ९५ टक्के केवळ विकासाचेच मुद्दे असतात. ते विकासावर बोलतच नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले.
त्यांना सांगा की, लगेच १ लाख रुपये पाठवा
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांना सांगा की, लगेच १ लाख रुपये पाठवा. कारण माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो. तुम्ही माझा संदेश घेऊन जा आणि १ लाख रुपये घेऊन या. मी लाडक्या बहिणींना देईन, असे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, महानगर पालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरीत करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यालाही फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत
काँग्रेस आणि आमचे विरोधक पहिल्या दिवसापासून आमच्या लाडक्या बहिणींना विरोध करत आहेत. मागच्या काळात आम्ही जेव्हा योजना सुरू केली, तेव्हा ही योजना बंद करा, अशी मागणी घेऊन उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात त्यांना दाद मिळाली नाही. आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकू नका म्हणतात. लाडकी बहीण योजना सुरू असलेली योजना आहे. सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये म्हटले आहे की, कोणतीच सुरू असलेली योजना थांबवता येत नाही. त्यामुळे त्यांनी कितीही पत्र लिहिली, तरी त्यातून त्यांचे लाडक्या बहिणींबद्दल असलेले विषच बाहेर येईल. पण लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाहीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.