"कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार"; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 11:35 IST2026-01-06T11:18:18+5:302026-01-06T11:35:20+5:30
शिवडीतल्या सभेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिदेसेनेवर जोरदार टीका केली.

"कितीही कुहू-कुहू केलं तरी, साहेब शिवडी तुमचीच राहणार"; नांदगावकरांचे लालबागमध्ये जोरदार भाषण
Bala Nandgaonkar Lalbaug: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा जोर असून दक्षिण मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या लालबाग-शिवडी परिसरात जोरदार प्रचार सुररु आहे. ठाकरे गटाचे निष्ठावान मानले जाणारे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित निर्धार मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कोकीळ यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली.
शिवडी येथील मेळाव्यात बोलताना बाळा नांदगावकर यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरला. ते म्हणाले, "वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आपले हृदय आहेत, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आपल्या बाळासाहेबांचे दोन डोळे आहेत. समोर बसलेला शिवसैनिक हा या शक्तीचा तिसरा डोळा आहे. त्यामुळे कितीही डोमकावळे आले किंवा कितीही कोकीळा कुहू कुहू करायला लागल्या,तरीसुद्धा हे जाळून राख केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. शिवसैनिक आणि मनसैनिक तुमच्या चरणी वंदन करतो. साहेब शिवडी तुमची आहे आणि तुमचीच राहणार," असं म्हणत नांदगावकार यांनी अनिल कोकीळ यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला.
उद्धव ठाकरेंचे मौन
प्रचाराच्या रणधुमाळीत सातत्याने दौरे आणि सभा घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा घसा पूर्णपणे खराब झाला आहे. लालबागच्या मेळाव्यात ते काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता होती, मात्र आवाजाच्या त्रासामुळे त्यांना भाषण करता आले नाही. त्यांच्या वतीने खासदार अरविंद सावंत यांनी संवाद साधला. उद्धव ठाकरेंना सध्या अजिबात बोलता येत नसल्याने त्यांनी मौन पाळले असले, तरी शिवसैनिकांचा उत्साह पाहून विजयाची खात्री पटल्याचा संदेश अरविंद सावंतांनी दिला.
अनिल कोकीळ यांचा शिंदे गटातून उमेदवारी अर्ज
बेस्ट कामगार सेनेपासून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या अनिल कोकीळ यांनी तिकीट न मिळाल्याने अखेर ठाकरेंची साथ सोडली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि तातडीने आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. २०१७ मध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या कोकीळ यांना बेस्ट समितीचे अध्यक्षपदही मिळाले होते. मात्र, अंतर्गत मतभेद आणि उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेतला.
दरम्यान, १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी आता केवळ १० दिवस उरले आहेत. लालबाग-शिवडी हा भाग नेहमीच ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील बड्या नेत्याचे पक्षांतर ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. या गळतीला रोखण्यासाठीच आता राज ठाकरे यांचे विश्वासू बाळा नांदगावकर आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले.