मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:24 IST2025-12-30T13:22:33+5:302025-12-30T13:24:29+5:30
Sanjay Raut News: आम्ही सन्मानाने आघाडी केली आहे. मुंबईत १४० च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत, असे संजय राऊतांनी सांगितले.

मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
Sanjay Raut News: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. कोणता पक्ष कोणासोबत निवडणुका लढवणार हे जाहीर झाल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटत आहे. उमेदवारीवरून अनेक पक्षांमध्ये नाराजी वाढत असून, बंडखोरीचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभांबाबत माहिती दिली.
आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानाने आघाडी केली आहे. मुंबईत १४० च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत. राज ठाकरेंचा पक्षही मोठ्या प्रमाणावर जागा लढवतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही जागा देत आहोत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना स्वाभिमानाने बाजूला होऊन स्वबळावर लढली
संजय राऊत म्हणाले की, २०१७ ला भाजपाची तेव्हाची भूमिका फेटाळून आम्ही स्वतंत्र लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा भाजपाने अशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली, तेव्हा शिवसेना स्वाभिमानाने बाजूला होऊन स्वबळावर लढली. पण लाचारी पत्करली नाही. आम्ही लढलो, असे सांगत संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गटावर टीका केली.
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?
मुंबईसह ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा कार्यक्रम कसा असेल, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा होणार का, या प्रश्नावर बोलताना संजय राऊतांनी सांगितले की, मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांमध्ये, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत राज ठाकरे व ठाकरेंच्या संयुक्त सभा होतील. या सभांचे नियोजन सध्या चालू आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर शरद पवार एनडीएसोबत जाण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात. या निर्णयासाठी गौतम अदाणी मध्यस्थी करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार असे काही करतील असे मला वाटत नाही. गौतम अदानी हे काही महात्मा फुले नाहीत किंवा संत गाडगे बाबा नाही. शरद पवारांचे सर्व उद्योगपतींशी प्रेमाचे संबंध आहेत, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.