BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:31 IST2026-01-15T11:31:02+5:302026-01-15T11:31:53+5:30
BMC Election 2026 Raj Thackeray: मुंबई मनपा मतदानानंतर राज ठाकरे यांचा संताप. शाईऐवजी पेनचा वापर, 'पाडू' यंत्राचे गूढ आणि दुबार मतदारांवरून सरकारवर जोरदार टीका. वाचा सविस्तर.

BMC Election 2026: 'हा काय विकास? शाई पुसा आणि पुन्हा मतदान करा!'; राज ठाकरेंचा संताप, 'पाडू' मशीनवरून सरकारला ठणकावले
मुंबई: "सरकार आणि निवडणूक प्रशासन हे येनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. मतदानासाठी शाईऐवजी पेन वापरले जात आहेत, ज्याची शाई सहज पुसली जातेय. लोक बाहेर येतात, शाई पुसतात आणि पुन्हा आत जाऊन मतदान करतात; यालाच सरकार विकास म्हणते का?" असा बोचरा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "सध्याची सिस्टीम ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी काम करत आहे. दुबार मतदारांचा विषय आम्ही लावून धरला तेव्हा आधी प्रशासनाने तो नाकारला आणि आता स्वतःच दुबार मतदारांची यादी जाहीर केली. हा संपूर्ण प्रकार फ्रॉड आहे." आज तर वेगळेच दिसतेय. शाईऐवजी पेन आणले आहे, त्याची शाई पुसली जातेय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशा फ्रॉड निवडणुका घेऊन अशाप्रकारे सत्तेत येणे म्हणजे विजय म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असायला हव्यात, असेही राज म्हणाले.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच वापरल्या जाणाऱ्या PADU (Printing Auxiliary Display Unit) या यंत्रावरही राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला. "हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला आधी दाखवण्यात आले नाही. मतमोजणीच्या वेळी हे यंत्र वापरले जाणार आहे. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून मिळवलेला विजय हा विजय नसतो," असेही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश
राज ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना आणि मनसे सैनिकांना स्पष्ट आदेश दिले आहेत की, "प्रत्येक मतदान केंद्रावर सतर्क राहा. जे लोक शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा जे दुबार मतदार आहेत, त्यांच्यावर कडक नजर ठेवा." तसेच भाजप आमदार अमित साटम यांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी "आम्हाला जे करायचे आहे ते आम्ही करणारच," असा इशाराही दिला. तसेच बाहेर या, शाई पुसा, परत आत जा, मतदान करा, बाहेर या शाई पुसा परत आत जा, याला विकास म्हणतात का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.